कोणतेही मूल जन्माला येतानाच विद्वत्ता किंवा बुद्धिमत्ता घेऊन येत नाही. पालक, शिक्षक किंवा आसपासच्या समाजाच्या संस्कारांतून त्या मुलात ज्ञानाचे बीज पेरले जाते आणि फोफावते. कृत्रिम प्रज्ञा किंवा आर्टिफिश्यल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचेही तसेच. निर्मिती अवस्थेत असताना त्यात टाकलेली माहितीची भर कृत्रिम प्रज्ञेच्या ‘मशीन लर्निंग’ला चालना देते. मूल किंवा कृत्रिम प्रज्ञेवर होणाऱ्या ज्ञानसंस्कारांचे मोल किती? मानवाबाबत याचे मोजमाप करणे कठीण आहे. पण कृत्रिम प्रज्ञेवर होणाऱ्या ज्ञानसंस्कारांना आर्थिक मूल्यात तोलता येईल? न्यूयॉर्क टाइम्सने गेल्याच आठवड्यात ‘चॅटजीपीटी’विरोधात दाखल केलेल्या कॉपीराइट खटल्याने उपस्थित केलेला हा प्रश्न येत्या काळात एक गंभीर मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. तो कसा, याचा हा वेध.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

न्यूयॉर्क टाइम्सने दाखल केलेला खटला काय आहे?

‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने चॅटजीपीटीची निर्मिती करणारी ‘ओपनएआय’ ही संस्था आणि त्यातील मोठी हिस्सेदार असलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीविरोधात अमेरिकेतील मॅनहटन येथील मध्यवर्ती जिल्हा न्यायालयात स्वामित्व हक्कांचा भंग केल्याप्रकरणी खटला दाखल केला आहे. चॅटजीपीटी आणि तत्सम एआय यंत्रणांना प्रशिक्षित करण्यासाठी ‘टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लाखो लेखांतील माहिती अंतर्भूत करण्यात आली. मात्र यासाठी आपली परवानगी घेतली गेली नाही, असा दावा या खटल्यामध्ये करण्यात आला आहे.

हेही वाचा : विश्लेषण : मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कराचा गोंधळ नेमका काय? गुपचूप करवाढ, मग माघार?

‘न्यूयॉर्क टाइम्स’चे आक्षेप काय?

‘न्यूयॉर्क टाइम्स’ने या खटल्याद्वारे कोणत्याही आर्थिक भरपाईची मागणी केलेली नाही. मात्र, या कंपन्यांनी आपले कोट्यवधी डॉलरचे आणि कायदेशीर हक्कांचे नुकसान केल्याचे दाव्यात म्हटले आहे. या सर्व कंपन्यांनी ‘टाइम्स’मधील मजकुराचा वापर करून प्रशिक्षित केलेले सर्व चॅटबोट नष्ट करावेत, अशी मागणी या वृत्तपत्र संस्थेने केली आहे. आपल्या मालकी हक्कांच्या लेखांतील माहिती आत्मसात करणारी ही यंत्रणा आता याच माहितीच्या आधारे आपली व्यावसायिक स्पर्धक बनू पाहात आहे, अशी न्यूयॉर्क टाइम्सची तक्रार आहे. याबाबत ‘टाइम्स’ने मायक्रोसॉफ्ट आणि ओपनएआयशी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये संपर्क साधून सामंजस्य कराराचा आग्रह केला होता. मात्र, या दोन्ही कंपन्यांनी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. आता या कंपन्यांना न्यायालयीन लढाईला सामोरे जावे लागणार आहे.

‘एआय’साठी खटला निर्णायक?

हा खटला एक वृत्तपत्र कंपनी आणि एआय तंत्रज्ञान कंपनी यांच्यातील असला तरी त्याचे ठळक परिणाम नजीकच्या भविष्यात दिसून येणार आहेत. कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञान निर्मिती अवस्थेत असताना त्याच्याशी संबंधित मंडळी वगळता फारच कमी जणांना या तंत्रज्ञानाच्या क्षमता आणि विस्ताराची खात्री होती. त्यातही हे तंत्रज्ञान इतक्या त्वरेने बाजारनिर्मिती करेल, याबाबत अनेक जण साशंक होते. मात्र, ‘ओपनएआय’च्या चॅटजीपीटीला मिळालेली लोकप्रियता, या तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रांत झपाट्याने वाढलेला वापर आणि त्यातून सुरू झालेला आर्थिक ओघ साऱ्यांनाच अचंबित करणारा आहे. ओपनएआय या एका कंपनीचे मूल्य ८० अब्ज डॉलरच्या घरात पोहोचले आहे. या वाहत्या गंगेत हात धुऊन घेण्यासाठी सर्वच क्षेत्रे आतुर झाली आहेत. या तंत्रज्ञानातून स्वत:साठी आर्थिक स्रोत आणि व्यावसायिक संधी निर्माण करण्याचे प्रयत्न त्यानिमित्ताने सुरू झाले आहेत. ‘एआय’वर खटला दाखल करणारी न्यूयॉर्क टाइम्सही पहिली वृत्तपत्र कंपनी असली तरी, येत्या काळात अन्य माध्यम कंपन्या हा कित्ता गिरवू शकतील.

हेही वाचा : विश्लेषण: राज्याच्या साखर उत्पादनात वाढ होणार?

आर्थिक उत्पन्न हाच हेतू?

न्यूयॉर्क टाइम्सच्या खटल्यामागे चॅटजीपीटीशी आर्थिक समझोता करणे, हा एकमेव हेतू नाही. कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाच्या विस्ताराच्या अमर्याद संधी सध्या सर्वांनाच खुणावत आहेत. हे तंत्रज्ञान आपापल्या क्षेत्रात कसे उपयोगात आणता येईल, यावर खल सुरूच आहे. अशा वेळी एखाद्या एआय कंपनीशी हातमिळवणी करून पत्रकारितेशी संबंधित एखादे ‘एआय’ माॅडेल विकसित करण्याचाही ‘टाइम्स’चा विचार असू शकतो. ‘गेटी इमेजेस’ या छायाचित्र कंपनीच्या अन्य एका ‘एआय’ कंपनीशी झालेल्या वादाची फलश्रुती याकडेच बोट दाखवते. ‘स्टॅबिलिटी एआय’ नावाच्या या कंपनीच्या एआय तंत्रज्ञानाने आपल्या मालकी हक्काची लाखो छायाचित्रे विनापरवानगी वापरल्याची तक्रार ‘गेटी’ने जानेवारी २०२३ मध्ये केली होती. मात्र, पुढे सहा महिन्यांतच या कंपनीने आपली छायाचित्रे वापरू देण्यासाठी ‘एन्व्हिडिया’ कंपनीशी करार केला.

याचे परिणाम काय होतील?

अशा प्रकारचे खटले कायद्यातील बाबींवर दीर्घकाळ सुरूच राहतील. मात्र, यानिमित्ताने ‘एआय’ निर्मात्या कंपन्यांच्या फुकटखाऊ वृत्तीला लगाम बसू शकतो. इंटरनेटवर उपलब्ध आहे ती सर्व माहिती आपल्यासाठीच, या गृहीतकावर ‘एआय’ तंत्रज्ञान चालते. मात्र, ही माहिती निर्माण करणाऱ्यांना त्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागते, याचा विचारही या कंपन्या करत नाहीत. जोपर्यंत या कंपन्यांची सुविधा मोफत आणि मर्यादित होती, तोपर्यंत हे ठीक होते. मात्र, आता या कंपन्याच व्यवसाय करू लागल्या असल्याने त्यांच्या मोफतखोरीवर इतरांचे आक्षेप येणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे एक तर या कंपन्यांना माहितीचे मूल्य मोजावे लागेल किंवा कोणाच्याही स्वामित्व हक्काचा भंग न करता माहितीचा वापर करावा लागेल.

हेही वाचा : विश्लेषणः विमान अपघात, नरभक्षकता अन् १० दिवसांचा जीवघेणा प्रवास; वाचा नेटफ्लिक्सच्या ‘सोसायटी ऑफ द स्नो’मागची खरी कहाणी

ॲपलची हुशारी…

‘एआय’च्या स्वामित्व हक्कांच्या उल्लंघनावर चर्चा सुरू असतानाच ‘ॲपल’ कंपनीच्या हालचालींनी लक्ष वेधले आहे. ॲपल ही कंपनी स्वत:च एक ‘एआय’ यंत्रणा निर्माण करत असून या यंत्रणेला माहितीने समृद्ध करण्यासाठी ॲपलने विविध वृत्तपत्र संस्था आणि कंपन्यांशी बोलणी सुरू केली आहे. काही वृत्तपत्रांच्या जुन्या लेखांचे अधिकार मिळवण्यासाठी ॲपलने ५० दशलक्ष डॉलरचे करार केले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यामध्ये अमेरिकेतील अनेक वृत्तपत्र कंपन्यांचा समावेश आहे. ॲपल बातम्यांशी संबंधित ‘एआय’ तंत्रज्ञान निर्माण करत असावे, असा कयास यातून बांधला जात आहे. मात्र, हे करण्यापूर्वीच ॲपलने वृत्त कंपन्यांना करारबद्ध केल्याने या कंपनीशी संबंधित वाद उद्भवणार नाही, असे म्हटले जात आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why new york times sued microsoft openai chatgpt for billions online theft copyright print exp css