Donald Trump Resignation Rumors in US : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची दुसऱ्यांदा सूत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी एकापाठोपाठ एक महत्त्वाचे निर्णय घेतले. सुरुवातीला त्यांनी अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या परदेशी नागरिकांना देशाबाहेर हाकलून लावलं. त्यानंतर भारतासह जगभरातील अनेक देशांवर अतिरिक्त आयात शुल्क लादलं. इतक्यावरच न थांबता ट्रम्प यांनी अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना पारपत्र (व्हिसा) देण्याच्या नियमांमध्येही मोठे बदल केले. आता डोनाल्ड ट्रम्प लवकरच राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा देणार, अशी आवई अमेरिकेत उठली आहे. त्यांच्या राजीनाम्याबाबत समाजमाध्यमांवरही दावे-प्रतिदावे केले जात आहेत. नेमकी काय आहेत यामागची कारणं? त्यासंदर्भात घेतलेला हा आढावा…

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले. समाजमाध्यमांवर त्यांच्या प्रकृतीविषयी अनेक कयास बांधले गेले. मागील आठवड्यात काही दिवस ट्रम्प यांनी अमेरिकेतल्या सार्वजनिक कार्यक्रमांपासून दुरावा ठेवला, त्यामुळे त्यांच्या ठिकाणाबद्दल आणि प्रकृतीबद्दल वेगवेगळ्या अटकळी लावल्या गेल्या. सध्याच्या घडीला डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यपदाचा राजीनामा देणार अशी आवई अमेरिकेत उठली आहे. गेल्या आठवड्यात (२९ ऑगस्ट) अमेरिकेतील समाजमाध्यमांवर “Trump Is Dead” आणि “Where Is Trump?” हे हॅशटॅग ट्रेंड झाले. या अफवांमुळे अमेरिकेत आणि विशेषतः व्हाईट हाऊसच्या गलियार्‍यात मोठी खळबळ उडाली. काही माध्यमांनी आणि सोशल मीडियावरील वापरकर्त्यांनी ट्रम्प खरोखरच जिवंत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला.

डोनाल्ड ट्रम्प नेमके कुठे आहेत?

मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान ट्रम्प यांच्या हाताला जखम झाल्याचा एक व्हिडीओही समाजमाध्यमांवर वाऱ्यासारखा व्हायरल झाला होता. राष्ट्राध्यक्ष हे सतत लोकांशी हस्तांदोलन करत असल्याने त्यांच्या हातावर सूज आली आहे, असं स्पष्टीकरण व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेव्हिट यांनी त्यावेळी दिलं होतं. अखेर, ३० ऑगस्ट रोजी ट्रम्प व्हर्जिनिया येथील त्यांच्या गोल्फ क्लबमध्ये दिसून आले. यावेळी ट्रम्प यांनी पांढरा पोलो शर्ट, काळी पँट आणि लाल रंगाची ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ असा मजकूर असलेली टोपी घातली होती. तरीही काही लोकांनी ट्रम्प यांच्याबद्दल निराधार दावे केले. गोल्फ खेळताना दिसलेली व्यक्ती ट्रम्प नसून बनावट व्यक्ती असल्याचं त्यांचं म्हणणं होतं.

आणखी वाचा : रशियाकडून तेल खरेदी केल्याने भारताला किती झाला फायदा? आकडेवारी काय सांगते?

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपद सोडणार?

दरम्यान, ट्रम्प सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असले तरी त्यांच्या ‘Truth Social’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय होते. यादरम्यान मंगळवारी ते मोठी घोषणा करणार असल्याची बातमी आली आणि त्यामुळे तर्कवितर्क अजूनच वाढले. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले – “आज कदाचित अमेरिकेच्या नवीन राष्ट्राध्यक्षांची घोषणा होणार आहे. दुसऱ्या एकाने अंदाज व्यक्त केला की, ट्रम्प प्रकृतीच्या कारणास्तव राष्ट्राध्यक्षपद सोडतील आणि जे. डी. व्हान्स अमेरिकेची सूत्रे हातात घेतील. त्यांच्या नावाला रिपब्लिकन काँग्रेसकडूनही मान्यता मिळाली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (छायाचित्र पीटीआय)

ट्रम्प यांच्या राजीनाम्याची अफवा कशामुळे पसरली?

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानामुळं डोनाल्ड ट्रम्प यांच्या निधनाबद्दलची अफवा पसरली होती. बुधवारी (२७ ऑगस्ट) व्हान्स यांनी अमेरिकन वृत्तपत्र ‘यूएसए टुडे‘ला एक मुलाखत दिली. “डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर कोणतीही अनपेक्षित घटना घडली तर मी अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्यास तयार आहे, त्यासाठी मला प्रशिक्षणही देण्यात आलं आहे”, असं विधान त्यांनी मुलाखतीत केलं. व्हान्स यांनी जरी ट्रम्प निरोगी असून राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण करतील असं म्हटलं असलं, तरी त्यांच्या विधानामुळं अमेरिकेतील जनतेत संशयाची सुई निर्माण झाली. मंगळवारी ट्रम्प सार्वजनिकरित्या दिसल्यानंतर समाजमाध्यमांवर पुन्हा त्यांच्या राजीनाम्याची आवई उठली. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपलं पद सोडणार नाहीत, असं व्हाईट हाऊसमधील एका अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितलं.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी अमेरिकेत नाराजी?

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह (५० टक्के) जगभरातील अनेक देशांवर अतिरिक्त आयात शुल्क लादलं. त्यांच्या या निर्णयामुळे भारत व अमेरिका यांच्यातील व्यापार संबंधातही कटूता आली आहे. भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी बंद करावी, असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. मात्र, त्यांच्या दबावाला न जुमानता भारताने तेलाची आयात सुरूच ठेवली आहे. सोमवारी चीनमध्ये झालेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेऊन दोन्ही देशांमधील व्यापार संबंधांना बळकटी देण्याचे प्रयत्न केले.

हेही वाचा : पंचशील तत्वे काय आहेत? त्यामुळे भारत-चीन संबंध सुधारणार? मोदी-जिनपिंग भेटीत काय घडलं?

अमेरिकेत महागाईचा उडाला भडका?

अमेरिकेनं भारतावर ५० टक्के आयात शुल्क लादल्यानंतर भारतीय वस्तूंची अमेरिकेतील निर्यात कमी झाली आहे, त्यामुळे ट्रम्प यांच्या देशात महागाईचा भडका उडाल्याचं सांगितलं जात आहे. याच कारणामुळे राष्ट्राध्यक्षांविरोधात अमेरिकन लोकांची नाराजी असल्याचं काहींचं म्हणणं आहे. त्यातच चीनमध्ये नुकत्याच झालेल्या शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध दिसून आले, त्यामुळे ट्रम्प यांच्याविरोधाची नाराजी अधिकच वाढल्याचं सांगितलं जात आहे. युक्रेन व रशिया यांच्यातील युद्धविराम करण्याच्या प्रयत्नात ट्रम्प यांनी भारताबरोबरचे चांगले व्यापार संबंध खराब केले, असा आरोप अमेरिकेतील काही लोक करीत आहेत.

ट्रम्प प्रशासनाला आठवली भारताबरोबरची मैत्री

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यानंतर अमेरिकेला भारताबरोबरची मैत्री आठवली. सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध हे नवीन उंची गाठत राहतील अशी पोस्ट केली. “या महिन्यात आपण, आपल्याला पुढे घेऊन जात असलेले लोक, प्रगती आणि संधींवर लक्ष केंद्रित करीत आहोत. नवे उपक्रम आणि उद्योजकता यांपासून संरक्षण आणि द्विपक्षीय संबंधांपर्यंत आपल्या दोन्ही बाजूंच्या नागरिकांची टिकून राहिलेली मैत्री ही आपल्या या प्रवासाला ऊर्जा देते,” असं रुबिया यांनी म्हटलं आहे.