अमेरिका चंद्रावर २०३० पर्यंत अणुभट्टी (न्यूक्लियर प्लांट) उभारण्याची तयारी करीत आहे. प्राप्त माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक देश चंद्रावर पोहोचण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करीत आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या अंतराळ संस्था ‘नासा’च्या कार्यवाह प्रशासकांनी चंद्राच्या पृष्ठभागावर अणुभट्टी बसवण्याच्या प्रयत्नांना वेग देण्याचे निर्देश दिले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शॉन डफी यांची नासाचे कार्यवाह प्रशासक म्हणून नियुक्ती केल्यानंतर ही आतापर्यंतची सर्वांत मोठी घोषणा आहे. डफी हे परिवहन मंत्री (Secretary of transportation)देखील आहेत. ही योजना नक्की काय आहे? अमेरिकेला चंद्रावर अणुभट्टी का हवी आहे? ही योजना कधी प्रत्यक्षात येईल? त्याविषयी जाणून घेऊयात.

ही योजना नक्की काय आहे?

  • ‘पॉलिटिको’ने दिलेल्या माहितीनुसार, डफी यांनी २०३० पर्यंत चंद्रावर अणुभट्टी तैनात करण्याच्या योजनांना गती देण्याचा आदेश दिला आहे.
  • गेल्या गुरुवारी (३१ जुलै) पाठवलेल्या त्यांच्या मेमोमध्ये डफी यांनी लिहिले आहे, “मंगळावर उच्च ऊर्जानिर्मितीला मदत करण्यासाठी आणि अंतराळातील आपली राष्ट्रीय सुरक्षा बळकट करण्यासाठी या महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाला योग्यरीत्या आणि वेळेत पुढे नेणे अत्यावश्यक आहे.”
  • त्यांनी असेही लिहिले आहे की, ही अणुभट्टी कमीत कमी १०० किलोवॉट वीज पुरवेल.
  • त्यांच्या निर्देशात त्यांनी सांगितले आहे की, ३० दिवसांच्या आत नासाच्या एका अधिकाऱ्याची या प्रकल्पाची देखरेख करण्यासाठी नियुक्ती केली जावी आणि ६० दिवसांच्या आत कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले जावेत.
अमेरिकेच्या अंतराळ संस्था ‘नासा’च्या कार्यवाह प्रशासकांनी चंद्राच्या पृष्ठभागावर अणुभट्टी बसवण्याच्या प्रयत्नांना वेग देण्याचे निर्देश दिले आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

डफी यांनी त्यांच्या निर्देशात नमूद केले आहे की, चीन आणि रशिया यांचीही २०३० च्या मध्यापर्यंत चंद्रावर अणुभट्टी बसवण्याची योजना आहे. तिथे एक तळ (Base) तयार करण्यासाठी दोन्ही देश भागीदारी करत आहेत. जर त्यांची ही योजना आधी पूर्ण झाली, तर चीन आणि रशिया ‘प्रवेश-निषिद्ध क्षेत्र’ जाहीर करू शकतात आणि त्यामुळे अमेरिकेवर मर्यादा येतील, असे डफी म्हणाले. याच गोष्टीची माहिती एका अधिकाऱ्याने ‘पॉलिटिको’ला दिली. “ही दुसरी अंतराळ शर्यत जिंकण्यासारखे आहे,” असे ते म्हणाले. विशेष म्हणजे २०२२ मध्ये नासाने २०३० पर्यंत चंद्रावर अणुभट्टी बसवण्याची योजना जाहीर केली होती. या योजनेचा उद्देश चंद्राला परिक्रमा करणाऱ्या ऊर्जा केंद्रात (Orbiting power station) रूपांतरित करण्याचा होता. त्यावेळी, कमीत कमी ४० किलोव\ट वीज पुरवणारी ऊर्जा प्रणाली (Fission power system) तयार करण्यासाठी संशोधन केले जात होते.

चंद्रावरील अणुभट्टीचा खर्च किती असेल?

चंद्रावरील अणुभट्टी उभारण्यासाठी लागणारा अचूक खर्च अद्याप कोणालाही ज्ञात नाही. हा आकडा मोठा असेल अशी अपेक्षा आहे. शॉन डफी यांनी आपल्या निर्देशात ट्रम्प यांच्या २०२६ च्या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पाचा उल्लेख केला आहे, त्यात मंगळासाठी उच्च प्राधान्य असलेल्या तंत्रज्ञानाच्या विकासाला गती देण्यासाठी ३५० दशलक्ष डॉलर्सची नोंद आहे. २०२७ च्या आर्थिक वर्षापासून हे निधी ५०० दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढेल.

अमेरिकेला चंद्रावर अणुभट्टी का उभारायचीय?

अमेरिकेचा चंद्रावर अणुभट्टी उभारण्याचा एकमात्र उद्देश म्हणजे ऊर्जा. सध्या चंद्रावर जाणारी अंतराळयाने आणि अंतराळवीर सौर पॅनेल आणि बॅटरीवर अवलंबून असतात. मात्र, चंद्राच्या पृष्ठभागावर सौरऊर्जा निर्माण करणे कठीण आहे. कारण- तेथे दोन आठवडे सतत सूर्यप्रकाश असतो. त्यानंतर दोन आठवड्यांची रात्र असते. त्याशिवाय नासा आणि चीन दोघेही चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर लक्ष केंद्रित करत आहेत, जिथे सूर्यप्रकाश क्वचितच असतो. अशा परिस्थितीत अंतराळयानाला वीज पुरवणारी अणुभट्टी असणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. खरं तर, नासा २०२७ मध्ये ‘आर्टेमिस’ मोहीम प्रक्षेपित करणार आहे. या मोहिमेचा उद्देश चंद्रावर मानवी वस्ती स्थापित करणे आहे. अंतराळ तज्ज्ञांच्या मते, हा प्रकल्प यशस्वी झाल्यास, चंद्रावर आणि नंतर मंगळावर दीर्घकाळ चालणाऱ्या मोहिमांसाठी ते फायदेशीर ठरेल.

जर माणसांना चंद्रावर आणि मंगळावर राहायचे असेल, तर त्यांना वीजनिर्मितीची समस्या सोडवावी लागेल आणि तिथे अणुभट्टी महत्त्वाची ठरेल, असे तज्ज्ञ सांगतात. वेल्समधील बांगोर विद्यापीठातील ‘न्यूक्लियर फ्युचर्स इन्स्टिट्यूट’चे सायमन मिडलबर यांनी ‘बीबीसी’ला सांगितले, “सत्य हे आहे की चंद्रावर ऊर्जा आणण्यासाठी अणुऊर्जा हाच एकमेव पर्याय आहे. अणुऊर्जा हाच एकमेव मार्ग आहे. आपण तिथे इंधन घेऊन जाऊ शकत नाही. तिथे सौर पॅनेल वा डिझेल जनरेटर काम करणार नाहीत आणि जुन्या पद्धतीचे रेडिओ-थर्मल जनरेटरही काम करणार नाहीत.”

चीन आणि रशियाची योजना काय?

डफी यांनी चंद्रावरील अणुभट्टीच्या योजनांना गती दिली आहे. कारण- रशिया आणि चीन यांनी २०३५ पर्यंत अशीच एक योजना जाहीर केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला रशियाची अंतराळ संस्था ‘रोस्कॉसमॉस’ आणि ‘चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’ (CNSA) यांच्यात या प्रकल्पासाठी सामंजस्य करार झाला. ‘रोस्कॉसमॉस’चे महासंचालक युरी बोरिसोव्ह यांनी रशियाच्या सरकारी माध्यमांना सांगितले की, चंद्रावरील हा तळ माणसांच्या उपस्थितीशिवाय तयार केला जाईल. तज्ज्ञांच्या मते, चंद्रावरील तंत्रज्ञानाची ही शर्यत म्हणजे पृथ्वीवरील भू-राजकीय संघर्षाचा विस्तार आहे.