मोसमी पावसाने काही अपवाद वगळता संपूर्ण ऑगस्ट महिना राज्यात उघडीप दिली होती. राज्य सरकारने मंत्रालयात दुष्काळ निवारण कक्ष सुरू करण्याइतपत स्थिती बिघडली. आता हवामान विभागाने मोसमी पाऊस पुनरागमन करण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचा खरिपाला दिलासा मिळेल का, याचा आढावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

देशात किंवा राज्यात मोसमी पाऊस सक्रिय होण्यासाठी काही पूरक, पोषक वातावरण किंवा व्यवस्था तयार होण्याची गरज असते. बंगालचा उपसागर, अरबी समुद्रात वाऱ्याची चक्रीय स्थिती, कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यास चांगला पाऊस पडतो. ऑगस्ट महिन्यात अशी पोषक स्थिती निर्माण न झाल्यामुळे जवळपास संपूर्ण ऑगस्ट महिना राज्यात पावसाचा खंड पडला. आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे पाच सप्टेंबरनंतर राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम म्हणून पुढील दोन ते तीन दिवसांत कोकण आणि गोव्यात मुसळधार, मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हेही वाचा – मणिपूरमधील स्वायत्त जिल्हा परिषदा म्हणजे काय? हिंसाचार भडकण्यास या परिषदा कारणीभूत ठरल्या?

किनारपट्टीवरील खरिपाला दिलासा मिळेल?

महिनाभराच्या पावसाच्या ओढीमुळे अगदी किनारपट्टीवरील भात पीकही अडचणीत आले आहे. भात रोपे पिवळी पडू लागली आहेत. सिंचनाची सोय नसलेल्या हलक्या, खडकावरील भात लागवडी वाया गेल्या आहेत. भात रोपाला फुटवे, लोंबी पडण्याच्या अवस्थेतच पाणी न मिळाल्यामुळे भातपिके अडचणीत आली आहेत. आता किनारपट्टीवर आणि घाटमाथ्यावर पाऊस सुरू झाल्यास भातपिकाला जीवदान मिळू शकते. सिंचनाचा खर्च वाचू शकतो. पण, सरासरी भात उत्पादनाला फटका बसणार आहे. भातासह अन्य कडधान्ये, नाचणी, वरईसारख्या पिकांच्या उत्पादनातही घट येणार आहे. पण, संपूर्ण पीकच वाया जाण्यापेक्षा काहीतरी हाती येईल, याचेच समाधान जास्त असेल.

पर्जन्यछायेच्या प्रदेशाला फायदा होणार?

सांगली, सातारा, पुणे आणि नगर जिल्ह्यांच्या पूर्व भागातील खरिपाची पिके जळून गेली आहेत. खरिपातील पिके प्रामुख्याने पावसावर अवलंबून असतात. सिंचनाची फारशी सोय असत नाही. हलक्या जमिनीतील, माळरानावरील पिके करपून गेली आहेत. शेतकऱ्यांनी पिकांत जनावरे सोडून दिली आहेत. रब्बी ज्वारी किंवा रब्बीतील अन्य पिकांसाठी शेतजमिनी मोकळ्या करण्यासाठी जळालेल्या पिकांवर कुळव किंवा रोटावेटर फिरविला आहे. त्यामुळे जळून गेलेल्या पिकांसाठी काही उपयोग होणार नाही. पण, सिंचनाच्या सोयींमुळे जिवंत असलेल्या पिकांसाठी फायदा होऊ शकतो.

कापूस, सोयाबीनला दिलासा मिळणार?

राज्यात सुमारे १४० लाख हेक्टरवर खरीप पेरण्या होतात. किनारपट्टी वगळता राज्यात सर्वदूर सोयाबीनची पेरणी होती. तर किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता राज्यभरात कापसाची पेरणी होते. राज्यात सोयाबीनची सुमारे ५० लाख हेक्टर तर कापसाची सुमारे ४० लाख हेक्टरवर पेरणी होते. मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ अशी सर्वदूर ही लागवड असते. यंदा ही लागवड अडचणीत आली आहे. पिकाची वाढ खुंटली आहे. पावसाअभावी पिके करपू लागली आहेत. अळ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. सिंचनाची सोय नसलेल्या जमिनीतील सोयाबीन, कापसाचे पीक हातचे गेले आहे. आता सिंचनाची सोय असलेल्या ठिकाणीही पाणी कमी पडत आहे. अशा अवस्थेत चांगला पाऊस झाल्यास काही प्रमाणात तरी पिके हाताला लागू शकतील.

फळपिकांना जीवदान मिळणार?

राज्यात फळपिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. आता पूर्वहंगामी सीताफळांचा हंगाम सुरू आहे. पण, पाऊस नसल्यामुळे सीताफळांची योग्य वाढ झालेली दिसत नाही. बाजारात लहान-लहान सीताफळे येत आहेत. आता पाऊस सुरू झाल्यास किमान अखरेच्या टप्प्यातील सीताफळांना तरी फायदा होऊ शकतो. दुष्काळी, कमी पावसाच्या पट्ट्यात डाळिंबाची शेती होते. यंदा कमी पाऊस ही डाळिंब पिकाला पोषक स्थिती असते. पण, यंदा इतका कमी पाऊस पडला आहे. पिकाला पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. द्राक्षबागांच्या पूर्वहंगामी फळ छाटण्या सुरू झाल्या आहेत. ऑक्टोबर महिन्यापासून मुख्य हंगाम सुरू होतो. पण, पिण्याला पाणी मिळेना तिथे द्राक्षबागांना कुठून पाणी आणायचे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चांगला पाऊस झाला तर द्राक्ष हंगामाला दिलासा मिळू शकतो.

हेही वाचा – विश्लेषण: पश्चिम नद्यांचे पाणी मराठवाडय़ात येईल?

रब्बी हंगामासाठी पाण्याची तजवीज?

राज्यात ऑगस्टनंतर सामान्यपणे मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो. हा मुसळधार पाऊस असतो. नद्या, नाले, ओढे याच पावसात भरून वाहत असतात. सप्टेंबरच्या सुरुवातीपासून पुन्हा पाऊस सक्रिय झाल्यास आगामी रब्बी हंगामाला चांगला दिलासा मिळू शकतो. रब्बी हंगाम सिंचनाची सोय असलेल्या जमिनीतच प्रामुख्याने घेतला जातो. पण, सिंचनासाठी पुरेसे पाणी नसेल तर रब्बीत पेरण्याच होणार नाहीत. त्यामुळे चांगला पाऊस झाल्यास शेतकरी रब्बीतील लागवडीवर भर देतील. खरिपातील झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी रब्बीवर अवलंबून असणार आहेत. चांगला पाऊस झाल्यास किमान रब्बी हंगामातील पिके तरी हाताला लागतील.

dattatray.jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will the return of rain bring relief to kharif crops print exp ssb