भारतीय सैन्यदलात अग्निपथ योजनेतून दाखल झालेल्या अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचा चार वर्षांचा सेवा कालावधी पुढील वर्षी पूर्ण होणार आहे. संरक्षण मंत्रालय अग्निपथ योजनेत काही सुधारणा करण्यावर विचार करीत आहे. यामध्ये प्रशिक्षित, अनुभवी अग्निवीरांना सैन्यदलाकडे अधिक प्रमाणात राखून ठेवण्याचाही अंतर्भाव आहे. या सुधारणांना मान्यता मिळाल्यास अधिकाधिक अग्निवीर सुरुवातीच्या चार वर्षांच्या कालावधीनंतर त्यांची सेवा वाढवू शकतील, सैन्यदलांशी ते जोडलेले राहतील.
विचाराधीन बदल काय?
सैन्यदलाच्या बहुचर्चित अग्निपथ भरती योजनेत काही सुधारणा आणि बदल करण्याचा विचार होत आहे. यामध्ये अग्निवीरांच्या धारणा अर्थात राखून ठेवण्याच्या दरात वाढ, त्यांची भरपाई आणि फायद्यात सुधारणा आदींचा समावेश असू शकतो. या योजनेतील मूळ निकषानुसार चार वर्षांचा सेवाकाळ पूर्ण करणाऱ्या तुकडीतील २५ टक्के अग्निवीरांना राखून ठेवण्याचा निकष आहे. त्यात बदल होण्याचा अंदाज वर्तविला जातो. जमिनीवर अपेक्षित लढाऊ ताकद कायम राखण्यासाठी लष्कराने चार वर्षांच्या अखेरीस राखून ठेवल्या जाणाऱ्या अग्निवीरांची टक्केवारी सुमारे ५० टक्के वा त्याहून अधिक म्हणजे ७५ टक्क्यांपयंंत वाढविण्याची शिफारस केल्याचे सांगितले जाते.
लष्करी कमाडंर परिषदेत चर्चा न झाल्याचे स्पष्ट
मे महिन्यातील सिंदूर मोहिमेनंतर पहिली लष्करी कमांडर परिषद जैसलमेर येथे झाली. याआधी एप्रिलच्या सुरुवातीला ही परिषद दिल्लीत पार पडली होती. भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देशाच्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा, त्यांचे मूल्यांकन आणि नवीन आव्हानांना तोंड देण्यासारख्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी हे व्यासपीठ काम करते. जैसलमेर येथील परिषदेत अग्निवीरांच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता वर्तविली गेली. परंतु, लष्कराने त्याचे खंडन केले. तसा विषय परिषदेच्या पटलावर नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. लष्करी कमांडर परिषद म्हणजे बंद दाराआड होणारे संस्थात्मक व्यासपीठ आहे. या ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षा व कार्यवाहीसाठी सज्जतेशी संबंधित संवेदनशील बाबींवर सर्वोच्च स्तरावर चर्चा केली जाते, असे लष्करी प्रवक्त्याने म्हटले आहे. परिषदेचा उद्देश आणि अग्निवीरांचा विषय भिन्न असल्याने या व्यासपीठावर त्याची चर्चा होण्याची शक्यता नव्हती.
अग्निपथ योजना काय?
सैन्यदलातील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्याबरोबर निवृत्ती वेतनाचा भार हलका करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने २०२२ मध्ये अग्निपथ योजना सुरू केली. पहिल्या वर्षी ४६ हजार युवकांची भरती करण्याचे निश्चित झाले होते. या अंतर्गत अग्निवीरांना चार वर्षांच्या अल्पकालीन करारावर लष्कर, नौदल आणि हवाई दलात भरती केले जाते. दरवर्षी भरती होणाऱ्यापैकी केवळ २५ टक्केच कायमस्वरूपी सेवेसाठी पात्र असतात. त्यांची सेवा काळातील कामगिरी, वैद्यकीय तपासणी, शारीरिक आणि लेखी चाचण्यांमधून स्थायी सेवेसाठी निवड केली जाईल. सेवा काळ झाल्यानंतर २५ टक्के अग्निवीर राखून ठेवले जातील. राखून ठेवण्याची टक्केवारी बदलून ती ५० वा ७५ टक्क्यांवर नेण्याचा विचार आहे.
पुनर्विचाराची निकड
अग्निवीर म्हणून भरती झालेल्या युवकांना साधारणत: सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. पुढील साडेतीन वर्ष ते नियुक्त झालेल्या ठिकाणी कार्यरत राहतात. सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर मूळ निकषानुसार ७५ टक्के अग्निवीर सैन्यदलातून बाहेर पडतात. प्रशिक्षणावर मोठा खर्च होतो. अग्निवीर लवकर निघून गेल्यावर प्रशिक्षणावरील खर्च वाया जातो, असा एक मतप्रवाह सैन्यदलातून समोर आला. मुळात अल्पकालीन लष्करी सेवेच्या योजनेला विरोधी पक्षांसह सैन्य दलात कायमस्वरूपी सेवेची आस बाळगणाऱ्या युवकांकडून प्रारंभीच प्रचंड विरोध झाला होता. चार वर्षांच्या कार्यकाळानंतर अग्निवीरांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त झाली. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी ही योजना रद्द करण्याची मागणी केली. तर भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांनी आढावा घेण्याचा सल्ला दिला होता. देशातील काही भागात सैन्यदलात कार्यरत असणाऱ्यांची मोठी संख्या आहे. तिथे लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला झळ बसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे काही सुधारणांद्वारे योजनेविषयीचा दृष्टिकोन बदलण्याची तयारी होत आहे.
गोरखा रेजिमेंटलाही झळ?
नेपाळमधील गोरखा समुदाय जागतिक पातळीवर लढवय्या म्हणून ओळखला जातो. अल्पकालीन लष्करी सेवेची अग्निपथ योजना जाहीर झाल्यानंतर नेपाळने आपल्या दे्शात सैन्य भरती मेळाव्यांना परवानगी दिली नव्हती. नेपाळी गोरख्यांना अल्प मुदतीच्या सेवेतून सवलत देण्याचा आग्रह नेपाळकडून धरला गेला. नेपाळमथील भरती थांबल्याने सैन्याला गोरखा रेजिमेंटमधील नेपाळी गोरख्यांचा अनुशेष भरून काढणे जिकिरीचे ठरले. ही पोकळी भरून काढण्यासाठी लष्कराने उत्तराखंडमधील कुमाऊँ व गढवाल भागातून जवानांची भरती सुरू केली. नेपाळमधील भरती थांबल्याने गोरखा रेजिमेंटची रचना बदलत असल्याचे सांगितले जाते.
