Ganesh Puja Samagri List : भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी ‘श्री गणेश चतुर्थी’ (Ganesh Chaturthi 2024) साजरी केली जाते. या सणानिमित्त बाजारात खरेदीसाठी लगबग, तर अनेक सार्वजनिक गणपतींचे आगमन होताना दिसत आहे. बाप्पाच्या आगमनासाठी वेळेत डेकोरेशन पूर्ण करण्याची धावपळसुद्धा सुरू आहे. यंदा बाप्पाचं आगमन ७ सप्टेंबर २०२४ रोजी होणार आहे, तर गणेश चतुर्थीला घरोघरी गणेशमूर्तींची स्थापना करून जितके दिवस गणपती बसवण्यात आला आहे तितके दिवस विधीवत पूजा केली जाते आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi 2024) दिवशी गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेची पूजा केली जाते. ही पूजा करताना विविध साहित्याची आवश्यकता असते. पण, एनवेळी पूजेदरम्यान आपल्याला एखादी वस्तू मिळत नाही. मग दुकानात जाऊन ती वस्तू आणणे किंवा घरात ती वस्तू शोधण्यात प्रचंड वेळ जातो. जर तुमच्याही घरी गणपती बाप्पा विराजमान होणार असतील तर काही दिवस आधी पूजेसाठी आवश्यक वस्तू घरी आणा…

हेही वाचा…Ganesh Chaturthi Decoration Ideas: मोजकं सामान वापरून करा बाप्पासाठी ‘असं’ खास डेकोरेशन; ऐनवेळी झटपट सजावट करण्यासाठी स्वस्तात मस्त पाच टिप्स

प्रतिष्ठापना पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पुढीलप्रमाणे…

१. गणपती बाप्पाला विराजमान केल्यावर चौरंगावर किंवा पाटावर ठेवण्यासाठी वस्त्र, तर दाराबाहेर काढण्यासाठी रांगोळी.

२. पूजेसाठी लागणारे महत्त्वाचे साहित्य म्हणजे निरांजन, उदबत्ती, समई, धूप, कापूर, वाती, आरतीचे ताट.

३. पाच फळे, सुपारी, नारळ, विड्याची पाने, सुक्या खोबऱ्याची वाटी व त्यात ठेवायला गूळ, सुट्टे पैसे.

४. पूजेच्या ठिकाणी ठेवण्यासाठी कलश, पाणी व आंब्याची पाने.

५. निवडलेल्या दुर्वांची २१-२१ ची जुडी.

६. गणपतीची मूर्ती सजवण्यासाठी व बाप्पाला आवडतात म्हणून लाल जास्वंदाची फुले, सुगंधित फुले, दुर्वा.

७. पूजेदरम्यान श्लोक म्हणण्यासाठी अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र, आरतीचे पुस्तक.

८. मूर्तीला अर्पण करण्यासाठी जानवे, कार्पासवस्त्र (कापसाचे व्रस्त्र) आणि पूजेसाठी दोन ताम्हण, तीन पोफळे.

९. अभिषेक करण्यासाठी पंचामृत, सुगंधित जल, शुद्ध पाणी, अष्टगंध, हळद, कुंकू आणि अक्षता.

१०. गणेशाला अभिषेक करण्यासाठी दूध, दही, तूप, मध आणि साखरेपासून बनवलेले पंचामृत.

या यादीतील अनेक गोष्टी तुमच्या घरीसुद्धा उपलब्ध असतील, तर काही गोष्टी तुम्हाला बाजारातून आणाव्या लागतील. गणेशोत्सव (Ganesh Chaturthi 2024 ) काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, त्यामुळे मूर्ती स्थापनेआधी या सगळ्या वस्तू पूजेसाठी घरी आणून ठेवा, म्हणजे तुमचा वेळही वाचेल आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापनेची पूजा अगदी वेळेत होईल.

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh chaturthi 2024 bappa murti sthapana puja samagri here is the list of items needed for the puja as per the rituals asp