Ganesh Chaturthi 2022 : अनंत चतुर्दशीला का केले जाते गणपती बाप्पाचे विसर्जन? जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि यावर्षीचा शुभ मुहूर्त

‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी विनंती करत अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप दिला जातो. पण गणपती बाप्पाचे विसर्जन अनंत चतुर्दशीला का केले जाते यामागची दंतकथा बऱ्याच जणांना माहित नसते.

Anant Chaturdashi

देशात सर्वत्र जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाने भक्तगण आनंदात आहेत. १० दिवस सर्वजण मनोभावे बाप्पाची सेवा करून अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचे विसर्जन करतात. १० दिवस सर्वत्र उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण असते. यानंतर गणपती बाप्पा आता थेट पुढच्या वर्षी दर्शन देणार या भावनेने भक्त उदास होतात. पण ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी विनंती करत अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप दिला जातो. यावर्षी अनंत चतुर्दशी ९ सप्टेंबर, शुक्रवारी साजरी केली जाणार आहे. मात्र, गणपती बाप्पाचे विसर्जन अनंत चतुर्दशीलाच का केले जाते हे बऱ्याच जणांना माहित नसेल. यामागचे कारण आणि या दिवसाचे महत्त्व जाणून घेऊया.

यावर्षी अनंत चतुर्दशी ९ सप्टेंबर, शुक्रवारी साजरी केली जाणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार भाद्रपद महिन्याच्या चौदाव्या दिवशी अनंत चतुर्दशी येते. या दिवशी १० दिवसांचा गणेशोत्सव संपतो, म्हणुन या दिवसाला अनंत चतुर्दशी म्हटले जाते. चतुर म्हणजे चार आणि दशी म्हणजे दहा.

आणखी वाचा : ‘लालबागचा राजा’चं दर्शन घेण्याची ओढ! गुजरातहून चालत निघाला भक्त, केला ७७० किमीचा प्रवास

अनंत चतुर्दशीचा इतिहास

एका पौराणिक कथेनुसार गणपती बाप्पाने महाभारत ग्रंथ लिहला आहे. असे म्हटले जाते की, ऋषी वेद व्यासांनी महाभारत आत्मसात केले होते परंतु ते हा ग्रंथ लिहण्यास असमर्थ होते. हा ग्रंथ लिहिण्यासाठी त्यांना अखंड ग्रंथ लिहू शकणाऱ्या दिव्यआत्मा असणाऱ्या व्यक्तीची गरज होती. या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्यांनी ब्रह्म देवाला प्रार्थना केली. ब्रह्म देवाने सुचवले की, गणपती बुद्धीची देवता आहे ते हा ग्रंथ पुर्ण करण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करतील.

त्यानंतर ऋषी वेद व्यास यांनी गणपतीला महाभारत लिहिण्याची विनंती केली आणि त्यांनी त्याला होकार दिला. ऋषी वेद व्यासांनी चतुर्थीच्या दिवसापासून महाभारताची कथा सांगण्यास सूरूवात केली आणि गणपती बाप्पा सतत लिहीत राहिले. दहाव्या दिवशी ऋषी वेद व्यासांनी डोळे उघडले. तेव्हा त्यांना दिसले की गणपती बाप्पाच्या शरीराचे तापमान खूप वाढले आहे. गणपती बाप्पाच्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी, ऋषी वेद व्यास यांनी त्यांच्या शरीरावर मातीचा लेप लावला. गणपती बाप्पाच्या शरीराला थंडावा मिळावा यासाठी ऋषी वेद व्यास यांनी लेप सुकल्यानंतर त्यांना नदीत उडी मारायला लावली. तो दिवस अनंत चतुर्दशीचा दिवस होता. यामुळेच गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते आणि अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जाते, असे मानले जाते.

आणखी वाचा : KGF मधील रॉकी स्टाइल गणपतीवरुन वाद; अनेकांना पटली नाही संकल्पना, जाणून घ्या नेमकं प्रकरण

शुभ मुहूर्त
यावर्षी गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी ६:०३ ते संध्याकाळी ६:०७ पर्यंत आहे. रवियोग सकाळी ६:०३ ते ११:३५ पर्यंत आहे, तर सुकर्म योग सकाळी ६:१२ ते संध्याकाळी ६:१२ पर्यंत आहे.

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२२ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-09-2022 at 14:16 IST
Next Story
पुणे : विसर्जन दिवशी मार्केट यार्डातील भाजीपाला बाजार सुरूच
Exit mobile version