नाईलाजाने प्रवाह बरोबर जावे लागत आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी प्रवाहाबरोबर जाण्याचे फायदे आहेत, अशी भूमिका मांडत खासदार धैर्यशील माने यांनी शिंदे गटाशी जवळीक साधने हितकारक असल्याचा संदेश दिला आहे.
याबाबत शिंदे यांची एक ध्वनी चित्रफीत सोमवारी समाज माध्यमात अग्रेषित झाली आहे. यामध्ये त्यांनी शिवसेनेअंतर्गत वादातील घडामोडींचा परामर्श घेतला आहे. त्यात खासदार माने म्हणाले, उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे या दोघांनी एकत्र यावे असे खासदारांनी दोन्ही नेत्यांना सांगितले आहे. नेतृत्वाने काही निर्णय घेतला तर त्याबाबतीत कार्यकर्त्यांच्या मर्यादा असतात. आता काही गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत. आपण परिस्थितीचे बळी ठरलो आहोत.
प्रवाहाबरोबर जाण्यामुळे मतदार संघाच्या विकासाचे काही फायदे आहेत. गुवाहाटी येथे राजकीय घडामोडी घडत असतानाही एकनाथ शिंदे यांनी इचलकरंजी महापालिका दर्जा देण्याची अधिसूचना जारी केली. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदान मागणीचा निर्णयही त्यांनी मान्य केला आहे. असे आणखी काही दोन-चार महत्त्वपूर्ण कामे करू शकलो तर मतदारसंघात प्रभावी लोकप्रतिनिधी अशी प्रतिमा निर्माण होणार आहे, असे नमूद करत माने यांनी शिंदे यांच्याबरोबरच्या राजकीय सोयरीचे फायदे विशद करतानाच कल कोणत्या दिशेने जात आहे हे स्पष्ट केले आहे.