कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळावरून विमानांची उड्डाणे सुरू झाली आहेत. आता देशातील आठ ठिकाणी विमानसेवा सुरू असून ती डिसेंबरअखेर १८ शहरात सुरू होणार आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली. ते म्हणाले, कोल्हापूर ते दिल्ली विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सातही दिवस ही विमानसेवा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

कोल्हापूर ते मुंबई नियमित विमानसेवा सुरू व्हावी या प्रयत्नाला यश आले आहे. २८ ऑक्टोबरपासून कोल्हापूर -मुंबई नियमित विमानसेवा सुरू होईल. सकाळी साडेसात वाजता कोल्हापुरातून विमान उड्डाण करेल. तर संध्याकाळी साडेसातच्या अगोदर ते मुंबई येथून कोल्हापूरला पोहोचेल. कोल्हापूरच्या विमानतळाचे विस्तारीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

लाइन क्लबची सुरुवात

वैमानिक तयार करण्यासंबंधीचे प्रशिक्षण देणारी फ्लाईंग क्लबची कोल्हापुरात सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी दोन ते तीन कंपन्या उत्सुक आहेत. याचा फायदा कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातील तरुण-तरुणींना होईल, असे महाडिक म्हणाले.

आंतरराष्ट्रीय विमानतळ

भविष्यकाळात कोल्हापूरचे विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ बनविण्यासाठी नियोजन सुरू असून यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चा झाली असता त्यांनी यासंबंधी सर्वे करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. येत्या पाच ते सहा महिन्यात हा सर्वे पूर्ण होईल.

१८०० विमानांची खरेदी

जगभरात विमान प्रवाशांची संख्या वाढत आहे. कोल्हापूरही याला अपवाद नाही. आगामी तीन वर्षांत १८०० नवीन विमाने भारतात येणार आहेत. यावरून विमानसेवेचे वाढते महत्त्व लक्षात येत आहे. कोल्हापुरातील उद्योजकांनी चार विमानांच्या खरेदीसाठी नोंदणी केल्याचे त्यांनी सांगितले.

सह्याद्री एक्स्प्रेस ही रेल्वे सेवा सध्या कोल्हापूर ते पुण्यापर्यंत सुरू आहे. मुंबई येथील रेल्वे स्टेशनचे दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे आणखी दोन महिने ही रेल्वे सेवा पुण्यापर्यंतच धावेल. साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापासून सह्याद्री एक्स्प्रेस मुंबईपर्यंत धावेल, असेही महाडिक म्हणाले. कोल्हापूर विमानतळाच्या विकासाबाबत नवी दिल्लीमध्ये बैठक झाली.

नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. विमानतळ प्राधिकरणाचे संयुक्त महासंचालक सुरज मल, सदस्य एम. सुरेश, कार्यकारी संचालक सुजय डे, ए.एस. महेशा, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर विमानतळाचे संचालक अनिल शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.