दाभोलकर हत्येप्रकरणातील संशयित डॉ. वीरेंद्र तावडे याला चौकशीसाठी ताब्यात देण्याबाबतचा अर्ज कोल्हापूर पोलिसांनी मंगळवारी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. पाटील यांच्या न्यायालयात केला. दाभोलकर हत्येप्रकरणी तपास करणारे सीबीआय पथक कोल्हापुरात दाखल झाले असून, दाभोलकर हत्येप्रकरणी अटक केलेल्या डॉ. वीरेंद्र तावडे याच्याशी संबंधित पाच जणांकडे कसून चौकशी केली.
दाभोलकर हत्येप्रकरणी अटक केलेल्या तावडे याने पोलीस कोठडीदरम्यान दिलेल्या माहितीची उलटतपासणी साक्षीदारांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पथकाने तावडे याने दिलेल्या माहितीच्या आधारे पाच जणांकडे पाच तास कसून चौकशी केली.
या पाच जणांकडे पानसरे हत्येचा तपास करणाऱ्या पथकाने चौकशी करून त्यांचे जबाब घेतले होते. त्याच साक्षीदारांकडे सीबीआयने चौकशी केल्याने पानसरे व दाभोलकर हत्येमागे एकच पथक असल्याचा संशय तपास यंत्रणांना होता.
याबाबत आणखी एक पुरावा मिळाल्याचे तपास अधिकाऱ्याने सांगितले. या साक्षीदारांच्या जबाबाद्वारे तपास यंत्रणा पानसरे, दाभोलकर यांच्या हत्येमधील कडी जोडत आहेत. तावडे याला अटक केल्यानंतर तावडे व सनातनशी संबंधित २५ जणांची चौकशी केली आहे. या २५ जणांचे जबाबही तपास पथकाने नोंदवल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पानसरे, दाभोलकर यांच्या हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू असून, गुरुवार (ता. २३) रोजी तपास अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. याच अनुषंगाने स्कॉटलँड यार्ड येथे पाठवलेल्या पुंगळय़ांचा बॅलेस्टिक रिपोर्ट तत्काळ मिळावा अशी मागणी एसआयटीने सीबीआयकडे केली आहे.
दरम्यान, तावडे याला चौकशीसाठी ताब्यात मिळण्याबाबतचा न्यायालयाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर तो आदेश पुणे येथील न्यायालयात सादर करून कोल्हापूर पोलीस तावडेचा ताबा घेणार आहेत. तावडेचा ताबा मिळाल्यानंतर समीर व तावडे यांना समोरासमोर आणण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
