कोल्हापूर : कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे एकंदरीत आढाव्यातून दिसून येते. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी अधिक सतर्कपणे प्रचार केला पाहिजे. कार्यकर्त्यांनी ७ तारखेला मतदान पूर्ण होईपर्यंत जागरूक राहून आपले कर्तव्य पार पाडावे, असा संदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे दिला.

कर्नाटकात रवाना होण्यापूर्वी काही काळासाठी शहा कोल्हापुरात थांबले होते. महानगर अध्यक्ष विजय जाधव यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. खासदार धनंजय महाडिक, माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे तसेच संजय मंडलिक, धैर्यशील माने या उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये शहा यांनी दोन्ही मतदारसंघाचा आढावा घेतला.

हेही वाचा – नरेंद्र मोदी यांच्या इतकी पंतप्रधान पदाची अप्रतिष्ठा कधीही झाली नाही – शरद पवार

हेही वाचा – “धर्माच्या आधारावर आरक्षण आम्हाला मान्य नाही”; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “मोदींनी स्वत:..”

पक्षाचे कार्यक्रम, मोठ्या सभा, त्यांना मिळणारा प्रतिसाद, मित्रपक्ष, घटक पक्ष नेत्यांची प्रचारातील सक्रियता, सहकार, कृषी विभागातील काम, एकंदरीत राजकीय घडामोडी आदी मुद्द्यांबाबत त्यांनी चर्चा केली. उन्हामुळे मतदान कमी प्रमाणात होत असल्याने कोल्हापुरात मतदानादिवशी सकाळी दहा पूर्वी अधिकाधिक मतदान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे, असा सल्ला त्यांनी दिला.