कोल्हापूर : गोकुळमध्ये महादेवराव महाडिक यांची सत्ता असताना मतदान ठरावासाठी पैसे देण्याची वृत्ती नव्हती. त्यांनी सुसंस्कृत पद्धतीने कामकाज केले. गेल्या चार वर्षातच ठरावासाठी पैसे पाठवण्याचा प्रयोग सत्ताधाऱ्यांनी सुरू केला आहे, अशा शब्दात खासदार धनंजय महाडिक यांनी पुन्हा एकदा गोकुळचे नेते, आमदार सतेज पाटील यांना टीकेचे लक्ष्य केले.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीकरिता आतापासूनच ठराव धारक प्रतिनिधींना गाठले जात आहे. त्यासाठी नजराणा अग्रिम स्वरूपात दिला जात आहे. तर कळे गावात एका दूध संस्थेच्या वार्षिक सभेत मतदानाचा ठराव करण्यासाठी पाच लाखाची बोली बोलली गेली. याकडे आज पत्रकार परिषदेमध्ये लक्ष वेधले असता खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर टीका केली. अशा पद्धतीने ठराव करण्यासाठी ४०० कोटी रुपये लागतील, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यावर महाडिक यांनी आमच्यासाठी हा खूप मोठा आकडा आहे, असे उत्तर दिले.

गोकुळ संघाची निवडणूक ही महायुती स्वरूपात होईल, असा दावाही धनंजय महाडिक यांनी पुन्हा एकदा केला.मात्र, गोकुळ बाबत सहकार आणि राजकारण या तफावत असते असे म्हणत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे महायुती आणि काँग्रेस नेते सतेज पाटील अशा दोन्ही दर्डीवर पाय ठेवून राजकारण करीत आहेत, याकडे लक्ष वेधले असता हा मुद्दा हसन मुश्रीफ यांच्याकडे मांडून याबाबत त्यांच्याकडून स्पष्टीकरण घ्यावे, अशी अपेक्षा महाडिक यांनी यावेळी व्यक्त केली.

कोल्हापूर महापालिका हद्दवाढ ही जरूर होणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे . पण त्यामुळे कोल्हापूर महापालिका निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा निर्वाळा त्यांनी दिला. कोल्हापूर महापालिका निवडणूक ही महायुती म्हणून एकत्रित लढली जाणार आहे. तसे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले आहेत. भाजपला कोणताही राजकीय भूकंप घडवण्याची आवश्यकता नाही. महापौर , जिल्हा परिषद अध्यक्ष आमचाच होईल, असा दावाही त्यांनी केला.

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी कोल्हापूर उत्तरमधून शिवसेनेला ३० जागा मिळाल्या पाहिजेत असा दावा आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला आहे. याकडे लक्ष वेधले असता खासदार महाडिक म्हणाले, मागील महापालिका सभागृहामध्ये भाजप – ताराराणी आघाडीचे ३४, राष्ट्रवादीचे १४ तर शिवसेनेचे ४ सदस्य होते. त्यामुळे त्या प्रमाणातच महायुतीचे जागावाटप अपेक्षित आहे. काँग्रेसने जिंकलेल्या २९ जागा बाबत महायुतीमध्ये जागावाटप होऊ शकते. पण त्यातही गेल्यावेळी कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या त्या टक्केवारीचे सूत्र येथेही लागू होईल. पण यामुळे महायुतीमध्ये वादंग होतील असे वाटत नाही, असा विश्वास महाडिक यांनी यावेळी व्यक्त केला.

गोकुळवर लक्ष ठेवू

अमूल दूध संघासह अनेक प्रमुख दूध संघाने जीएसटी फेररचना झाल्यानंतर ददुग्ध पदार्थांच्या दरामध्ये कपात केली आहे. परंतु महायुतीचे अध्यक् असलेल्या गोकुळ दूध संघाने मात्र कोणत्याही पदार्थांचे दर कमी केलेले नाहीत, याकडे लक्ष वेधले असता खासदार धनंजय महाडिक यांनी याबाबत आम्ही गोकुळ मध्ये लक्ष घालू, असे उत्तर दिले.