कोल्हापूर : कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खून खटल्यातील तिघा प्रमुख संशयीतांना मंगळवारी जामीन मंजूर झाला आहे. खून प्रकरणातील संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे, शरद कळसकर, अमोल काळे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘कोल्हापूर सर्किट बेंच’मध्ये हा जामीन मंजूर करण्यात आला.

गोविंद पानसरे व उमा पानसरे हे उभयता १६ फेब्रुवारी २०१५ रोजी येथे प्रभात फेरीला गेले असताना गोळीबार झाला होता. जखमी झालेले पानसरे यांचा २० फेब्रुवारी २०१५ रोजी मृत्यू झाला होता. याप्रकरणी संशयित म्हणून वरील तिघांना अटक करण्यात आली आहे.

गेल्या दहा वर्षापासून हा खून खटला सुरू आहे. या तपासावर न्यायालयाने अनेक वेळा ताशेरे ओढलेले होते. खुनाचा तपास सुरुवातीला पोलीस गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष विभागाकडे होता. नंतर तो दोन वर्षांनी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला होता.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या नेमकी कोणी केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ९ जानेवारी २०२३ ला कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात दहा संशयितांवर हत्येचा कट आणि हत्या केल्याप्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले होते.

पानसरे हत्येचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पथकाकडून सुरू होता. ७ वर्षानंतरही तपासात प्रगती झाली नसल्याने पानसरे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने हा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपावा असे आदेश दिले होते. या पथकाला पूर्वीच्या पथकातील अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे असेही सूचित केले होते.

त्यानुसार एटीएसने तपास कामाची सूत्रे हाती घेतली. पानसरे हत्या खटल्याचा तपास कोल्हापूर न्यायालयात चालवला जावा असा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. ‘एटीएस’ न्यायालय सोलापूर येथे असून तेथे साक्षीदार, पंचांना कोल्हापूरहून घेऊन जाणे जोखमीचे होणार असल्याने खटल्याचा तपास कोल्हापुरातील न्यायालयातच व्हावा असा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला होता.

या प्रस्तावाची माहिती एटीएसचे अधीक्षक तुषार दोषी यांनी विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांच्यामार्फत येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्या न्यायालयात सादर केली होती. १६ जुलै २०२४ रोजी दहशतवाद विरोधी पथकाने डॉ. तावडे याला तातडीने ताब्यात घ्यावे असा आदेश न्यायाधीश तांबे यांनी सुनावणीवेळी दिला होता. त्यानुसार एटीएसने डॉ. तावडे यांना ताब्यात घेऊन सीपीआर येथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांची रवानगी कळंबा कारागृहात करण्यात आली होती.