कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी पावसाचा जोर आणखी वाढला. राधानगरी धरण पूर्ण भरले असून चार स्वयंचलित दरवाजातून निसर्ग सुरू झाला आहे. जिल्ह्यातील ४९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. रात्रभर पडणारा पाऊस आज दिवसभर कायम राहिला. पावसाचा जोर कायम राहिल्याने जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्याजवळ काल चार वाजता पाणी पातळी २३ फूट होती. ती आज याचवेळी २९ फूट झाली. या ठिकाणाहून १६,४२१ क्युसेकने पाण्याचा विसर्ग होता तो आज २९,१४१ इतका वाढला होता. जिल्ह्यातील पाण्याखालील बंधाऱ्यांची संख्या १२ वरून ४९ इतकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

राधानगरी तुडुंब

राधानगरी धरण काल रात्री पूर्णपणे भरले. रात्री दहा वाजता पहिला दरवाजा उघडला गेला. पहाटे स्वयंचलित द्वार क्र. चार सुद्धा उघडले आहे. एकूण ४ द्वारे उघडली आहेत. एकूण ७२१२ क्युसेक इतका विसर्ग नदी पात्रात सुरू आहे.

वारणाकाठी सतर्कता

वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत आहे. जलाशय परिचलन सूचीप्रमाणे एकूण १०,२६० क्युसेक विसर्ग होत असल्याने वारणा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.