कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावली. शिरोळ तालुक्याला रविवारी दुपारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. जोरदार पावसाने व्यापारी, वाहनधारक व नागरिकांची चांगलीच तारांबळा उडाली. या पावसाने शेतशिवारात पाणीच पाणी झाले असून वातावरणात गारवा जाणवत आहे.
जिल्ह्यात गेली दोन दिवस वातावरणात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे सूर्यदर्शन अभावाने होत होते. रविवारी सकाळपासूनच आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली होती. दुपारी कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. हातकणंगले, शिरोळ तालुक्याला पावसाने झोडपून काढले. दोन तास पडलेल्या या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. अनेक गावांमध्ये गटारी तुंबून रस्त्यावर पाणी आले होते.
गणेश उत्सवानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले होते. माळरानावरील पिकांना पावसाची आवश्यकता होती. आजच्या मुसळधार पावसाने शेतशिवार जलमय झाल्याचे दृश्य पाहायला मिळत होते. पाऊस पिकांना पोषक असल्याने बळीराजातून समाधान व्यक्त होत आहे. या पावसाने मात्र वातावरणात गारवा वाढला होता.