कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात उद्योग व्यवसायाबरोबरच धार्मिक स्थळे, निसर्ग पर्यटन मोठ्या प्रमाणात आहे. पर्यटन क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात स्थानिक अर्थ चक्र बदलत आहे. राज्यातील पहिली शाश्वत विकास परिषद कोल्हापूर येथे होत असून यातून जिल्ह्यातील उद्योग, आयटी आणि पर्यटन क्षेत्राला गती मिळेल असे प्रतिपादन कार्यकारी अध्यक्ष राज्य नियोजन मंडळ, राजेश क्षीरसागर यांनी केले. २५ जून रोजी होणाऱ्या परिषदेच्या अनुषंगाने तयारीबाबत राजेश क्षीरसागर आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. २५ जून रोजी सयाजी हॉटेल मधे विक्टोरिया सभागृहात सकाळी ते सायंकाळी ६.०० वा. पर्यंत वेगवेगळे विषय घेऊन शाश्वत विकासाबाबत चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग, आयटी आणि पर्यटन क्षेत्राला गती देण्यासाठी या परिषदेतून मोठ्या प्रमाणात सामंजस्य करार आणि घोषणाही होणार आहेत. त्या परिषदेसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, स्थानिक आमदार, खासदार यांचेसह राज्यस्तरावरून त्या त्या विभागाचे प्रधान सचिव, सचिव, व्यावसायिक तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा : कोल्हापूरात बस डेपोसाठी १२.६५ कोटीचा निधी मंजूर – धनंजय महाडिक

सकाळी दीपप्रज्वलन झाल्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व मनोगत नंतर मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रास्ताविक करतील. नंतर ५ भागात चर्चासत्र होणार आहेत. यात फाउंडरी आणि इंजीनियरिंग, टेक्स्टाइल, आयटी, टुरिझम आणि फ़ूड प्रोसेसिंग असे विषय असणार आहेत. शेवटी विविध उद्योग व्यवसायाशी निगडित सामंजस्य करार होतील व कोल्हापुरच्या अनुषंगाने घोषणा होतील.

हेही वाचा : कोल्हापूर: सोळांकुर गैबी घाटात दरड कोसळली; सार्वजनिक विभागाने लक्ष घालण्याची मागणी

भारत सरकारकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त भारताला सन २०४७ पर्यंत “विकसित भारत” करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे, तसेच सन २०३० पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्टे सुद्धा साध्य करण्याचा मानस आहे. विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्याची अर्थव्यवस्था २०२८ पर्यंत एक ट्रिलियन यूएस डॉलर करणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे. या अनुषंगाने विकासाचे केंद्र म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचा शाश्वत व आर्थिक विकासासाठी विचारपूर्वक आणि विशिष्ट दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक आहे असल्याचे मत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur industries and tourism sector will boost due to sustainable development council css