कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिंदेसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शाहू महाराज यांना उद्देशून गादीचा खरा वारसदार, गादी विरुद्ध मोदी असे वादग्रस्त मुद्दे उपस्थित केले होते. पाठोपाठ त्याचे सुपुत्र हमीदवाडा कारखान्याचे संचालक वीरेंद्र मंडलिक यांनी छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही, अशी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना आमदार सतेज पाटील व ठाकरे सेनेचे उपनेते संजय पवार यांनी वीरेंद्र मंडलिक यांनी आपले वय पाहून बोलावे, अशा शब्दांत पलटवार केला आहे.

हेही वाचा : वारणा समूहाची विश्वासार्हता दाखवून देताना धैर्यशील मानेंना विजयी करा; जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे

याबाबत कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील म्हणाले, वीरेंद्र मंडलिक हे बालिश आहेत. अशी विधाने करण्याचा उलटा परिणाम होऊन शाहू महाराजांना जनतेचा प्रतिसाद वाढत चालला असून ते तीन लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी होतील. संजय पवार यांनी वीरेंद्र मंडलिक यांचे विधान अशोभनीय असल्याचे म्हटले आहे. छत्रपती घराण्याने शाहू मिल सुरू केली नाही अशी टीका वीरेंद्र मंडलिक करत असतील तर खासदार म्हणून संजय मंडलिक यांनी याच मिलसाठी काय केले हेही त्यांनी सांगावे. संजय मंडलिक यांनी आजपर्यंत उद्धव ठाकरे, सतेज पाटील यांचा वापर करून दुसरीकडे निघून गेले. कागलचे भाजपचे नेते समरजित घाटगे यांनाही हाच अनुभव येणार असल्याने त्यांनी सावध राहावे.