राज्यात नव्याने सत्तारूढ  झालेल्या सरकारच्या पीक कर्जमाफीच्या आकडेवारीवरून कोल्हापुरात आजी- माजी खासदारांत जुगलबंदी सुरु आहे. माजी खासदार , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी याबाबत परस्परविरोधी दावे केले आहेत.

शेट्टी म्हणाले, की राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना खरीप पिकांवर काढलेले कर्ज फेडणे शक्य नाही. सध्याच्या कर्जमाफीच्या आदेशानुसार हा शेतकरी थकबाकीदार ठरत नाही. तसेच तो हे कर्ज बँकांना परतही करु शकत नाही. कारण त्याच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

नव्या कर्जमाफी योजनेनुसार मागील वर्षी जो शेतकरी थकबाकीदार ठरला तोच या योनजेसाठी पात्र ठरला आहे. तर,  यंदा ज्यांनी कर्ज काढले आहेत ते शेतकरी पात्र ठरत नाहीत. त्यामुळे या कर्जमाफीत त्रुटी आहेत. उद्धव ठाकरे यांचे सरकार सरसकट कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण करु शकलेले नाही. सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांच्या कर्जाची पूर्ण माहिती न घेता घाईगडबडीत निर्णय घेतल्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे सरकारने आपल्या या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी त्यांनी शनिवारी केली.

कर्जमाफीचा फायदा पूरग्रस्तांना-धैर्यशील माने

राजू शेट्टींची कर्जमाफीबद्दलची आकडेवारी ही शासकीय आकडेवारी नाही. त्यांनी सांगितलेली आकडेवारी कुठून आली माहिती नाही. मात्र, राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीचा फायदा कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांना होईल हे नक्की, असे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले. शेट्टी यांनी सरकारने केलेली कर्जमाफी केवळ ७ ते ८ हजार कोटींपर्यंतची असेल, असे म्हटले असले तरी ते माने यांना मान्य  नाही. ‘सध्याचे राज्य शासन संवेदनशील शासन आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील संवेदनशील आहेत. सरकार स्थापन होताच कर्जमाफीसारखा सर्वात मोठा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांच्याप्रति असणारी त्यांची संवेदना या विनाअट कर्जमाफीच्या निर्णयानंतर दिसून येते,’ असे माने म्हणाले.

२१ हजार कोटींची कर्जमाफी अशक्य-शेट्टी

अर्थमंत्री जयंत पाटील यांनी राज्यात २१ हजार कोटींची कर्जमाफी होत असल्याचे सांगितले आहे. मात्र, इतक्या मोठय़ा प्रमाणात कर्जमाफी होणे शक्यच नाही. कारण, या कर्जमाफीतील अटींमुळे याचा सर्व प्रकारच्या शेतकरम्य़ांना फायदा मिळणार नाही. त्यामुळे ही कर्जमाफी ६ ते ७ हजार कोटींच्या पुढे जाणार नाही, असे ते म्हणाले.