कोल्हापूर : बिबट्याच्या बछड्याने पन्हाळगड परिसरात केलेल्या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले आहेत. वन विभागाने शुक्रवारी ड्रोनद्वारे या बछड्याची शोध मोहीम चालू ठेवली.

पन्हाळगडाच्या पायथा परिसरात आठ महिन्यांपासून एक बिबट्या मादीचा दोन बछड्यांसह वावर होता. गुरुवारी सोमवार पेठेच्या भरवस्तीत याच कुटुंबातील एका बछड्याचा मृतदेह आढळला होता. शवविच्छेदनात त्याचा मृत्यू नर बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याचे निष्पन्न झाले होते. मादी बिबट्याशी मिलनोत्सुक झालेल्यामुळे नराकडून हल्ला झाला असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. या हल्ल्यामुळे ते कुटुंब विखुरले आहे. आई आणि बहिणीच्या विरहाने बिथरलेल्या बिबट्याच्या बछड्याने परिसरात धुडगूस घातला. त्याने गुरुवारी रात्री अजय आनंदा जाधव व विकास बाळू डावरे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात जाधव गंभीर जखमी झाले आहेत.

शुक्रवारी सकाळी आपटी गावाचे हद्दीतील गणपती मंदिराजवळ राम तानाजी गावडे व गीता रामराव गिरीगोसावी यांचा बिबट्याने पाठलाग केला. तसेच दुपारी जयवंत गोविंद डावरे यांच्यावर हल्ला झाल्याची दखल घेऊन यंत्रणा सतर्क झाली आहे. पन्हाळा परिक्षेत्र वनाधिकारी अजित माळी यांच्या उपस्थितीत बचाव पथक ड्रोनद्वारे बछड्याचा शोध घेत आहेत.