कोल्हापूर : महादेवी हत्ती नांदणी मठाला परत देण्याची वनतारा पशुसंग्रहालयाने तयारी दाखवल्यानंतर कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींनी याचे स्वागत केले आहे. या कामाला गती मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
नांदणी येथे वनताराच्या वतीने जागतिक दर्जाचे हत्ती पुनर्वसन केंद्र उभारण्यात येईल, असे स्पष्टीकरण वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान करणी यांनी बुधवारी येथे केले. त्याचे सामान्य नागरिक, भाविक, नांदणी ग्रामस्थ अशा विविध थरातून प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.
वज्रमूठ ठरली भारी – मुश्रीफ
नांदणी मठाच्या माधुरी ऊर्फ महादेवी हत्ती प्रश्नी कोल्हापूरकरांची वज्रमूठ भारी ठरली आहे. या प्रश्नावर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वधर्मीयांनी दाखविलेल्या एकजुटीमुळे हत्तीण परत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशा भावना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केल्या आहेत.
लोकभावनेचे यश – पाटील
माधुरी हत्तीच्या न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून परत येण्याचा निर्णय हा कोल्हापुरातील लोकांच्या एकजुटीचा आणि लोकभावनेचा विजय आहे. या सामूहिक लढ्याला दिलेल्या पाठिंब्याबद्दल कोल्हापूरकरांचे अभिनंदन, असे काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील म्हणाले.
अमित शहांची मदत – माने
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी तातडीने आवश्यक ती पावले उचलण्याचे स्पष्ट निर्देश गृहमंत्री अमित शहा यांनी संबंधित यंत्रणांना दिले. सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे मोठे यश आहे, असे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न – आवाडे
महादेवी हत्ती नांदणी मठाकडे परत देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न चालवले आहेत. त्यातून चांगले काही निष्पन्न होत आहे. वनतारा व्यवस्थापनाची ताजी भूमिका मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना बळ देणारी, सकारात्मक दिसते, असे आमदार राहुल आवाडे यांनी नमूद केले.
सातत्य हवे – शेट्टी
महादेवी हत्ती परत करा, या मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्यामध्ये जनतेच्या तीव्र जनभावना लक्षात आल्या आहेत. अंबानी समूहाला लोकभावना कशा असतात, याची जाणीव झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका दाखल करण्याच्या कामाला गती मिळावी, त्यात सातत्य असावे, असे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले.