लोकसभा आणि विधानसभेच्या जागावाटपाबद्दल महाविकास आघाडीत कोणतीही चर्चा आणि फॉर्म्युला तयार झाला नाही. शिवसेनेचे सर्वात जास्त खासदार निवडून आलेत. निवडून आलेल्या जागा कायम ठेवत शिल्लक राहिलेल्या जागांचं समान वाटप करायचं, असा फॉर्म्युला आला, तर सहानभुतीपूर्वक विचार होऊ शकतो, असं मत शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार विनायक राऊत यांनी मांडलं. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. "कर्नाटकचा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू होणार नाही. येथे फक्त उद्धव ठाकरेंचाच फॉर्म्युला असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत चर्चा होईल. पण, कोणत्याही परिस्थितीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या जातील. तसेच, प्रचंड बहुमताने जिंकत शिवशाहीची राजवट येईल," असा विश्वासही विनायक राऊत यांनी व्यक्त केला. हेही वाचा : ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडच्या बैठकीत नेमकं काय चर्चा झाली? अरविंद सावंत माहिती देत म्हणाले… "मिंधे गटाला बरोबर घेतल्यानंतर भाजपाला लागलेल्या." "पूर्ण ठाकरे गट असंतुष्ट आहे," असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. याला प्रत्युत्तर देताना विनायक राऊत म्हणाले, "ठाकरे गटाची चिंता देवेंद्र फडणवीसांनी करण्याची गरज नाही. चंद्रकांत पाटील एकीकडं बोलत आहेत. दुसरीकडं बावनकुळे बोलत आहेत. एक ना धड बाराभर चिंद्या तुमच्या चालू आहेत. मिंधे गटाला बरोबर घेतल्यानंतर भाजपाला लागलेल्या पनवतीची देवेंद्र फडणवीसांनी काळजी करावी." हेही वाचा : “मिंधे गटातील ४० कोंबड्यांच्या मानेवरून कधीही सुरी फिरेल”, ठाकरे गटाच्या टीकेला संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर; म्हणाले… "भुंकणारा कुत्रा कधी चावत नाही" नितेश राणेंचाही विनायक राऊतांनी समाचार घेतला आहे. "नितेश राणे आमच्या दृष्टीने चिंपाट माणूस आहे. त्यांना किंमत देत नाही. भाजपाने भुंकण्यासाठी त्यांना पाळलं आहे. भुंकणारा कुत्रा कधी चावत नाही," असा टोला राऊतांनी राणेंना लगावला आहे.