कोल्हापूर : ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर विनायक काळे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव घेतले असल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. डॉक्टर अजय तावरे यांची अधीक्षक शिफारस प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून संबंधित मंत्र्यांनीच त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे का ? असा प्रश्न प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला.

आज येथे पत्रकारांशी बोलत असताना नाना पटोले म्हणाले, डॉक्टर अजय तावरे यांना अधीक्षक करण्याची शिफारस कशी केली गेली? मुळात तावरे हे अनेक गैर कृत्यांमध्ये अडकले आहेत. तसे त्यांच्यावर अनेक आरोप आहेत.

हेही वाचा – कोल्हापुरातील ओम ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला दणका; जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्याने ५० हजारचा दंड

या पापाला जबाबदार कोण?

आमदार टिंगरे यांनी शिफारस केल्याने तसेच मंत्र्यांनी शेरा मारल्याने तावरे यांची अधीक्षकपदी निवड झाल्याचे समोर आले आहे. तावरे यांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या पापाला जबाबदार कोण ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – कोल्हापूर जिल्ह्यातील २२ पैकी एक वगळता सर्व खुनाचे गुन्हे उघडकीस – सुनील फुलारी

अधिवेशनात सरकारला घेरणार

आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये पोर्श हिट अँड रन हे प्रकरण उपस्थित करणार असून सरकारला घेरणार आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मंत्री मुश्रीफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात शेतकरी दुष्काळामध्ये मरत असताना श्रीमंतांच्या मोटारीखाली सामान्य चिरडले जात आहेत. तरी भाजप सरकारला याचे काही देणेघेणे नाही, अशी टीकाही पटोले यांनी केली.