कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात एप्रिल महिना अखेर खुनाच्या २२ घटना घडल्या, यापैकी २१ गुन्हे उघडकीस आले आहेत. दरोड्याचे दोन्ही गुन्हे उघडकीस आले असून त्यातून २८ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रविंद्र कळमकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, शशिराज पाटोळे व इतर अधिकारी हजर होते.

हेही वाचा – मागील हंगामातील उसाचे प्रतिटन १९० रुपये द्या – राजू शेट्टी यांची मागणी; आचारसंहितेनंतर बैठकीचे आयोजन – पालकमंत्री मुश्रीफ

लोकसभा निवडणुका शांततेत पार पडल्या, ४ जून रोजी मतमोजणीची तयारी अंतिम टप्यात आहे. या कालावधीत अप्रचाराला बळी पडून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. परिक्षेत्रात तगडा बंदोबस्त नेमला आहे. त्यामुळे गैरप्रकार आढळल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवावे. पाच जिल्ह्यात क्राईम आलेख स्थिर आहे.

निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाल्यापासून पोलिसांनी निवडणुका निर्विघ्न पार पडाव्यात यासाठी चोख नियोजन केले होते. त्यामुळे या कालावधीत नियम उल्लंघनाचे २१ व एनसी ६ असे गुन्हे दाखल झाले. मतमोजणीसाठी सर्वच जिल्ह्यात चोख बंदोबस्त नेमला आहे. ड्राय डे ठेवला आहे. पोलिसांचा सायबर विभाग सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टवर लक्ष ठेवून आहे. वादग्रस्त पोस्ट, रिल्स अपलोड करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेषकरून तरुणांनी अशा गुन्ह्यांपासून दूर रहावे, असे फुलारी यांनी सांगितले.

गुन्हे आलेख स्थिर

पाचही जिल्ह्याचा क्राईम आलेख स्थिर आहे. फसवणुकीच्या गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. यात उसतोड टोळ्या, दामदुप्पट, कमी कालावधीत जादा रक्कम देण्याचे आमिष दाखवून फसणाऱ्या गुन्ह्याची संख्या वाढली आहे.

कौटुंबिक हिंसाचार वाढले

कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाणही वाढले आहे. २०२२-२३ मध्ये १७ हजार संख्या होती. २०२३-२४ मध्ये ही संख्या १६ हजार ५०० इतकी आहे. तसेच सध्या नागरिकांच्या तक्रारी दाखल करुन घेण्याचा उपक्रम सुरु केला आहे. ती दाखल झाल्यानंतर त्यांचा तत्काळ छडा लावण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

४५ हजार प्रतिबंधक कारवाया

निवडणूक कालावधीत कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यात ४५ हजार प्रतिबंधात्मक कारवाया, १६०० दारुच्या कारवाया, ४२ सराईत गुन्हेगारांना तडीपार, कलम ५६ नुसार ८६ कारवाया, ७ टोळ्यातील ६१ आरोपींना मोक्का अशा कारवाया केल्या आहेत.

कायदद्याचे प्रशिक्षण सुरू

१ जूनपासून नवीन कायद्याची अंमलबजावणी सुरू होत आहे. नवीन कायद्यात कोणती कलमे वाढली आहेत, कोणती कमी झाली आहेत. याचा अभ्यास करण्यासाठी आणि कर्मचारी, अधिकाऱ्यांना माहिती व्हावी यासाठी पोलिसांना दिले जाणारे प्रशिक्षण अंतिम टप्पयात आल्याचे यावेळी फुलारी यांनी सांगितले.

हेही वाचा – कोल्हापुरातील ओम ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला दणका; जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्याने ५० हजारचा दंड

गर्भनिदान, गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश

सांगली येथील गर्भलिंग प्रकरणात आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गर्भपात प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्याचे काम सुरु आहे. या प्रकरणाचा निकाल तातडीने लागण्यासाठी सरकारी वकिलांसोबत चर्चा करुन अतिजलद न्यायालयात प्रकरण दाखल करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आक्षेपार्ह पोस्ट वगळले

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह स्टेटस संबधित नोडल अधिकाऱ्यांनी वगळले आहेत. १ जानेवारीपासून मेपर्यंत आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणी ११ गुन्हे दाखल केले असून १३ आरोपींना अटक करुन त्यांच्यावर कारवाई केली आहे. ११ अकाउंट बंद केले आहेत.