कोल्हापूर : शेतकऱ्याने पंजा मारण्याआधीच शेतक-याच्या डरकाळीचा आवाज ऐकुन शासनाने आज ऊस निर्यात बंदी आध्यादेश मागे घेतला आहे, अशी खरमरीत प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. राज्य शासनाने १४ सप्टेंबर रोजी एप्रिल २०२४ पर्यंत परराज्यात ऊस नेण्यास मनाई करणारा अध्यादेश लागू केला होता. या विरोधात शेतकरी संघटनांनी आवाज उठवला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ही यासंदर्भात आंदोलन सुरू केले होते. मात्र राज्य शासनाने नवी अधिसूचना काढून आपला पूर्वीचा निर्णय मागे घेतला असून निर्यात बंदी पासून मागे जाण्याचे ठरवले आहे. हेही वाचा >>> ‘गोकुळ’वरून राजकीय कुरघोड्या सुरूच या निर्णयावर बोलताना शेट्टी म्हणाले,राज्य सरकारला कायदेशीर अधिकार नसताना साखर कारखानदारांचा लाळघोटेपणा करत शेतक-यांनी परराज्यात ऊस न देण्याचा अध्यादेश काढला. या अध्यादेशाच्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने संपुर्ण राज्यात आदेशाची होळी करत बंदी आदेश झुगारून शेतक-यांनी ऊस घालण्याची भुमिका घेतली. यामध्ये सरकारची नामुष्की होणार हे लक्षात आल्याने शेतक-याने पंजा मारण्याआधीच शेतक-याच्या डरकाळीचा आवाज ऐकुण शासनाने आज बंदी आध्यादेश मागे घेतला आहे.