दयानंद लिपारे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : विधान परिषदेच्या कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाल्याने जिल्ह्यातील महाविकास आघाडीला आणखी बळकटी प्राप्त झाली आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांचा राजकीय प्रभाव वाढीस लागला आहे. भाजपच्या दृष्टीने झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली राहिल्याने वरिष्ठांच्या निर्णयाकडे बोट दाखवून माघार घेण्याचे रास्त समर्थन करता आले. हार वा जीत या गुंत्यात न अडकता भाजपला आपला हात अलगदपणे सोडवता आला.

कोल्हापूरची जागा महत्त्वाची होती. ती आघाडी आणि भाजप मधील अनेक नेत्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची होती. निवडणूक जिंकायची हे ध्येय ठेवून पालकमंत्री सतेज पाटील यांनी राजकीय जोडणी लावायला सुरुवात केली होती. तर भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमल महाडिक यांनी संपर्क यंत्रणा गतिमान केली होती.

दिल्ली दरबारी प्रयत्न

कोल्हापूर सह राज्यातील सहा जागांच्या निवडणुका बिनविरोध करण्याची भाजपची सशर्त तयारी असल्याचे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गेल्या आठवडय़ात केले होते. कोल्हापुरात निवडणूक जिंकण्या इतके संख्याबळ असल्याचा दावा करून ही जागा भाजपकडेच राहील असा दावा त्यांनी केला होता. दावे-प्रतिदावे यामुळे निवडणुकीला आणखीच धार प्राप्त झाली. सतेज पाटील यांच्या बरोबरच महा विकास आघाडीच्या तमाम नेत्यांनी मतांची पक्की जमवाजमव करण्यावर भर दिला. विजया इतपत संख्याबळ पाठीशी असल्याची त्यांनी खात्री करून घेतली. त्यासाठी मतदारांना आवश्यक असणारी रसद पुरवण्याचे कसर ठेवली नाही. हवी तर आणखी मदत करण्यात येईल असे संकेत देण्यात आले.

मतदारही त्यांच्या पाठीशी ठामपणे असल्याचे दिसून आले. ही बाब महा विकास आघाडीचे मनोबल वाढवणारी असताना विरोधी गोटात चिंतेचे वातावरण होते. आकडेवारीची दावे करून निवडणूक जिंकणे सोपे नाही ही बाब सुद्धा लक्षात आली. याच वेळी महा विकास आघाडी व भाजप या दोन्हींचा समन्वयाचा दुवा असणारे आमदार विनय कोरे यांनी वस्तुस्थितीची माहिती दिल्ली दरबारी आकडेवारीनिशी कानावर घातली.

मुंबईतील शिवसेनेची एक व भाजपचे एक तसेच धुळे येथील भाजपची जागा बिनविरोध करण्यात यावी. त्याचबरोबर कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्यात यावी अशा हालचाली सुरू झाल्या. राज्यातील प्रमुख नेते आणि आणि दिल्लीत अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चेच्या फेऱ्या होऊन या चारही जागा बिनविरोध करण्यास हिरवा कंदील दर्शविण्यात आला.विना कटकट निवडणूक सोपी गेल्याने सतेज पाटील यांना हायसे वाटले. मतदानाच्या जय-पराजयाच्या चRव्यूहात न अडकता अलगद सुटका झाल्याने भाजप व महाडिक यांनी सुटकेचा निश्वस टाकला.

विधान परिषद निवडणुक निकालावर सतेज पाटील यांच्या राजकीय भवितव्य पूर्णपणे अवलंबून होते. काहीही करून निवडणूक जिंकणे अपरिहार्य असल्याने कोणत्याही बाबीची कसर राहणार नाही याची अर्थपूर्ण तयारी केली होती. वारे विजयाच्या दिशेने असले तरी धोका होणार नाही याची काळजी घेतली होती.निवडणुकीला कलाटणी मिळून ती अनपेक्षितपणे बिनविरोध झाली. सतेज पाटील यांचा विधान परिषदेचाच नव्हे तर मंत्रिपदाचा प्रवासही निर्धोक राहिला. कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस बळकट केल्याचे श्रेय आधीच पाटील यांच्या खात्यावर जमा होते.

 विधानसभा, शिक्षक मतदार संघ, गोकुळ या निवडणुकीने पाटील यांचा राजकीय करीश्मा दिसून आला होता. विधानपरिषदेच्या या सहज-सोप्या विजयामुळे त्यांचा राजकीय प्रभाव आणखी वाढीस लागला आहे. सतेज पाटील यांच्याकडे दुसरम्य़ांदा राज्यमंत्री पद आले आहे. जिल्ह्यातील सर्वच महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये विजय मिळवत गेल्याने आता राज्य मंत्री नव्हे तर (कॅबिनेट) मंत्री पदाचे ते प्रबळ दावेदार ठरले आहेत. कोल्हापूर प्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस मजबूत करण्याची जबाबदारी पक्ष त्यांच्याकडे सोपवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याच बरोबर त्यांना साथ करणारे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा राजकीय महत्त्व या निवडणुकीतून अधोरेखित झाले आहे.

बिनविरोध निवडीने अनेकांचा हिरमोड

४१७ मतदारांना खेचण्यासाठी लाखमोलाच्या बोली लागल्या होत्या. मतागणिक गणित महत्त्व वाढत चालल्याने अर्थ गंगा वाहू लागली होती. करोडोंचा चुराडा होणार असे स्पष्टपणे दिसत असताना अनपेक्षित वळण लागले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satej patil elected unopposed in the legislative council election zws
First published on: 30-11-2021 at 01:50 IST