कोल्हापूर : महाविकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना या विकासाचा दृष्टिकोन बाळगणाऱ्या समविचारी लोकांना बरोबर घेऊन जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड नगरपालिकेची निवडणूक लढणार आहोत. जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही याच पद्धतीने लढवल्या जाणार आहेत, असे मत विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी जयसिंगपूर येथे एका बैठकीवेळी व्यक्त केले.

जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील,‘दत्त’चे संचालक अनिल यादव, उद्धव सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव उगळे, शिवसेना राज्य संघटक चंगेजखान पठाण उपस्थित होते.

जयसिंगपूर पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराचा पंचनामा प्रचाराच्या काळात केला जाईल. येथील नागरिकांना बदल हवा आहे. नागरिकांनी सत्ता द्यावी, एक वर्षात शहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही सतेज पाटील यांनी दिली.

राजू शेट्टी म्हणाले, शिरोळ तालुका विकास आघाडीच्या नावाखाली निवडणुका लढवल्या जातील. भुयारी गटार, पालिकेची प्रशासकीय इमारत, प्रॉपर्टी कार्ड, शहरानजीक जमिनीवर आरक्षण टाकून त्या विकत घ्यायच्या आणि यातून लोकांना लुटायचे या सगळ्या प्रकारांचा पर्दाफाश प्रचाराच्या काळात करणार आहे.

गणपतराव पाटील यांनी जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड पालिकेच्या निवडणुका एकदिलाने लढून नगराध्यक्ष नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन केले.