कोल्हापूर : राज्यातील जनतेसमोर महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. लोकांना स्थिर सरकार हवे आहे. लहान पक्षांचा टेकू नको आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जनता तिसरी आघाडी स्वीकारणे कठीण आहे, असा विश्वास विधान परिषदेतील गटनेते, आमदार सतेज पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवर सतेज पाटील म्हणाले, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत चालली आहे. वाचाळवीरांच्या वक्तव्याला त्यांच्याच भाषेत आम्ही उत्तर देऊ शकतो, पण ती कॉंग्रेसची संस्कृती नाही. भाजपच्या ५ खासदारांनीच त्यांचे सरकार घटना बदलणार असल्याचे म्हटले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही घटना अबाधित राहिली पाहिजे ही भूमिका राहुल गांधीनी मांडली. याची सत्यता लोकांनाही माहीत आहे.

हेही वाचा >>>केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी कागदावर! निधीच्या केवळ घोषणाच, चौकशी समितीकडून यंत्रणाही दोषमुक्त

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागावाटपावरून बरेच वाद आहेत. अनके जिल्ह्यांत त्यांच्यात भांडणे आहेत. दुसरीकडे मविआत उत्तम समन्वय असून कोणतेही वाद नाहीत. बऱ्याच जागांवर एकमत झाले आहे. शंभरएक जागांवर चर्चा सुरु आहे. लोकसभेप्रमाणे एकमताने यावेळीही निवडणूक लढवू. मतदार महाविकास आघाडीच्या बाजूनेच कौल देईल, असेही पाटील म्हणाले.