स्वातंत्रलढय़ापासून ते देश उभारणीपर्यंत काँग्रेसचे योगदान असल्याने नरेंद्र मोदी यांची ‘काँग्रेसमुक्त भारत’ करण्याची भाषा कधीच यशस्वी होणार नाही अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी यांच्यावर येथे शनिवारी केली.
पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते. या निमित्तानं आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. आमदार हसन मुश्रीफ यांनी श्री गोिवद मूर्ती, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले की, काँग्रेस पक्षाशी आम्हीही भांडलो, संघर्ष केला, पण हा पक्ष नष्ट करण्याची भाषा कधी केली नाही. देशाच्या स्वातंत्र्यलढय़ामध्ये अनेक काँग्रेसजनांनी त्याग केला आहे. स्वातंत्र्यलढय़ावेळी काँग्रेसने प्राणाची आहुती दिली. आज काँग्रेसवर बोलणारी मंडळी या लढय़ात कोठेच नव्हती. नेहरू, इंदिरा गांधी यांच्यापासून अनेक काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांच्या कष्ठातून देशाची उभारणी झाली आहे. देशहितासाठी योगदान देणाऱ्या काँग्रेसला संपवता येणार नाही.
काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही काँग्रेसची विचारधारा एकच असून ती सामाजिक हिताची आहे, असे सांगत त्यांनी काँग्रेस पक्षाशी नाते घट्ट करण्याचे संकेत दिले. राज्य, केंद्रात सत्ता आणण्यात दोन्ही काँग्रेस कमी पडली, पण आता बिघडलेले दुरुस्त करण्याची भूमिका घ्यावी लागेल, असे नमूद करून उभय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. याची सुरुवात प्रागतिक विचाराच्या कोल्हापुरातून व्हावी, अशी सूचना त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केली.