कोल्हापूर : ऊस दराच्या मागणीसाठी मंगळवारी दुसऱ्या दिवशीही कोल्हापूर जिल्ह्यात ऊस वाहतूक रोखण्यात आली. शिरोळ तालुक्यातील यड्रावकर इंडस्ट्रीज व पन्हाळा तालुक्यातील दालमिया शुगर या कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थांबवली.
ऊस दर जाहीर करून मगच हंगाम सुरू करावा, या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक बनल्या आहेत. या प्रश्नावर काल शिरोळ व कागल तालुक्यात ऊस वाहतूक बंद पाडण्यात आली होती. शिरोळ येथे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या गूळ पावडर निर्मिती करणाऱ्या कारखान्याची ऊस वाहतूक आंदोलन अंकुश या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यात जाऊन थांबवली होती.
आज या आंदोलनाला पाठिंबा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक करणारी वाहने तमदलगे गावामध्ये अडवली. आपली ऊस दराची भूमिका पटवून देत कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणारी वाहने पुन्हा शेताकडे पाठवून दिली.
अशाच प्रकारचे आंदोलन पन्हाळा तालुक्यात घडले. शिये या गावी दालमिया शुगर कडे चाललेली ऊस वाहतूक करणारी वाहने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अजित पोवार, विक्रम पाटील, संदीप चौगुले, नितेश कोगनोळे आदी कार्यकर्त्यांनी अडवून धरली. यामुळे आसुर्ले पोर्ले येथील या खासगी कारखान्याच्या गाळपात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
६ नोव्हेंबरपासून ठिय्या आंदोलन
दरम्यान या वर्षीच्या ऊस गळीत हंगामाचा उसाचा प्रतिटन दर जाहीर करणाऱ्या साखर कारखान्यांनाच गाळप सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी मंगळवारी महाराष्ट्र व कर्नाटकातील भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना यांच्यासह विविध शेतकरी संघटनांनी येथील प्रादेशिक उपसंचालक साखर यांच्याकडे केली. याच मागणीसाठी ६ नोव्हेंबरपासून प्रादेशिक उपसंचालक साखर कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.
आज विविध शेतकरी संघटनांनी येथील प्रादेशिक उपसंचालक साखर कार्यालयात निदर्शने केली. उसाचा दर जाहीर न करता कारखाने सुरू झाले असून, ते बंद करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात जय शिवराय शेतकरी संघटनेचे संस्थापक शिवाजी माने, एकनाथ शिंदे, शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, सावकार मादनाईक, भाजपच्या शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड संघटनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, आम आदमी पक्षाचे प्रदेश सचिव संदीप देसाई यांच्यासह शरद जोशी शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, रयत संघटना (कर्नाटक) आदी शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रादेशिक उपसंचालक साखर गोपाळ मावळे यांच्याकडे विविध मागण्या केल्या.
मावळे यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. उसाचा दर जाहीर करण्याबाबत शेतकरी संघटना, प्रादेशिक साखर संचालक व जिल्हाधिकारी अशी संयुक्त बैठक घेण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली.
