कोल्हापूर : हातकणंगलेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, मनसेचे माजी जिल्हाप्रमुख गजानन जाधव यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिंदे यांनी त्यांच्या हाती भगवा झेंडा देऊन पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यामुळे शिंदेसेनेने एकाचवेळी उद्धव ठाकरे व राज ठाकरे बंधूंना धक्का दिल्याचे दिसून आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर जिल्ह्यात एकनाथ शिंदे शिवसेनेकडून ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी फोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातून आज डॉ. मिणचेकर व मनसेचे माजी जिल्हाप्रमुख, शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख गजानन जाधव यांनी आज मुक्तागिरी निवासस्थानी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

डॉ. सुजित मिणचेकर आणि गजानन जाधव यांच्या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला अधिक बळकटी मिळणार असून पक्ष अधिक भक्कम होणार असल्याचे मत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीत या लोकसभेत खासदार धैर्यशील माने हे प्रचंड मतांनी विजयी झाले होते. तर विधानसभा निवडणुकीत येथे महायुतीचे १० पैकी १० आमदार विजयी झाले. त्यानंतर असाच विजय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मिळावा यासाठी डॉ. मिणचेकर, गजानन जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी नक्की प्रयत्न करतील असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. यामुळे शिंदे शिवसेनेचे जिल्ह्यातील राजकीय वजन वाढले आहे. या वेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान मिणचेकर हे २०२४ मध्ये झा लेल्या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत ऐनवेळी प्रवेश करून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र निवडणुकीचा पराभव झाला होता. २०१९ च्या निवडणुकीत ही त्यांना विजयाने हुलकावणी दिली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. २००९ आणि २०१४ मध्ये ते आमदार होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला होता. मात्र २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा हाती घेतला मात्र त्या ठिकाणी ते फार काळ टिकले नाहीत. गेल्या पाच महिन्यात त्यांनी दुसऱ्यांदा पक्ष बदलला. गेले काही दिवस ते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा होती. आणि आता त्यांनी प्रवेश केला आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sujit minchekar gajanan jadhav join shiv sena shock to uddhav raj thackeray ssb