कोल्हापूर : येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत महाडिक परिवाराने सत्ता कायम राखत विजयाचा झेंडा फडकवला. महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ आघाडीने सरासरी १५०० मताधिक्याने विजय मिळवताना विरोधी आमदार सतेज पाटील (बंटी पाटील) गटाचे पानिपत केले. सर्व २१ जागांवर विजय मिळवल्यावर महाडिक समर्थकांनी एकच जल्लोष केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कसबा बावडा या उपनगरातील राजाराम कारखान्यासाठी रविवारी चुरशीने ९१ टक्के मतदान झाले होते. महादेवराव महाडिक, अमल महाडिक विरुद्ध सतेज पाटील यांच्यातील राजकीय संघर्षाचा फैसला आज होणार होता. मतमोजणीत सुरुवातीपासूनच महाडिक यांच्या आघाडीचे उमेदवार आघाडीवर राहिले. काही केंद्रामध्ये विरोधकांना मताधिक्य मिळाले; मात्र ते पुढे फारसे टिकले नाही. नंतरच्या सर्वच फेऱ्यांमध्ये महाडिक यांची मताधिक्य घेतल्याने त्यांची सहजच सरशी झाली. महाडिक गटाचे उमेदवार सरासरी दीड ते पावणे दोन हजाराच्या मताधिक्याने विजय झाले. विरोधकांना पाच ते सव्वा पाच हजार इतके मते मिळाली.

पहिला विजय महाडिकांचा

लक्षवेधी ठरलेल्या संस्था गटात विरोधी गटाचे नेते महादेवराव महाडिक यांनी ८३ मते घेवून विजयाचे खाते खोलले. विरोधी उमेदवार सचिन पाटील यांना ४४ मते मिळाली. विजयाची ही गती पुढे कायम राहिली.

शिट्टी वाजली, दंड थोपटले

निकाल जाहीर होताच महाडिक समर्थकांनी राजाराम कारखाना कार्यस्थळी फटाक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला. नेहमीच्या शैलीत महादेवराव महाडिक यांनी जोरकस शिट्टी वाजवली तसेच दंड थोपटून आपल्या राजकीय ताकदीची चुणूक दाखवली. त्यांच्यासह अमल महाडिक, स्वरूप महाडिक व खासदार धनंजय महाडिक यांची विजयी मिरवणूक निघाली. यावेळी खासदार महाडिक यांनीही दंड थोपटून विरोधी गटाला आव्हान दिले.

सतेज पाटील निशाण्यावर

निकालानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना महाडिक कुटुंबीयांनी सतेज पाटील यांच्यावर टीकास्त्र डागले. सतेज पाटील यांनी या निवडणुकीत महाडिक गटाचा कंडका पाडणार असल्याचे म्हटले होते. त्याला उत्तर देताना माझ्यावर महाडिक यांनी मला कोणी आव्हान देण्याचा प्रयत्न करू नये. आधी धनंजय, अमल यांना सलामी द्या; मग माझ्याकडे या. शड्डू मारायला येत नाही त्यांना मी शिकवत नाही, असा टोला लावला. खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरच्या माजी पालकमंत्र्यांने द्वेष भावनेतून निवडणूक लावली. पण सभासदांनी त्यांची जागा दाखवली. मतदारांनी मनोरुग्णांचे अनेक कंडके पाडले आहेत, असा समाचार घेतला. अमल महाडिक म्हणाले, सतेज पाटील यांनी खालच्या स्तरावर जाऊन प्रचार केला तरी सभासदांनी आमच्या विकासाच्या बाजूने कौल दिला आहे. यापुढे राजाराम कारखान्यात सहवीच निर्मिती, आसवनी प्रकल्प उभारून चांगला दर देऊ.

महाडीकांनी शब्द पाळावा

विरोधी गटाचे नेते सतेज पाटील यांनी सभासदांना दिलेला कौल स्वीकारत आहे. निकालाचे आत्मचिंतन करण्यात येईल, असे सांगत पराभव स्वीकारला. वाढवलेल्या २ हजार सभासदांमुळेच त्यांचा विजय शक्य झाला. महाडिक यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे इथेनॉल प्रकल्प उभा करून शेतकऱ्यांना चांगला दर द्यावा. मतदान न केलेल्या सभासदांना द्वेष भावनेतून वागणूक देऊ नये. त्याचा उस नेताना पक्षपातीपणा करू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Victory of the mahadik family in the election of shree chhatrapati rajaram sahakari sugar factory in kolhapur amy