कोल्हापूर : अलमट्टी धरण उंची वाढीविरोधात रविवारी शिरोळ तालुक्यात सर्वपक्षीय नेते कर्नाटक विरोधात आक्रमक झाले. अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरने वाढवली जाणार असल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महापुराची तीव्रता वाढण्याची भीती व्यक्त करीत थेट अलमट्टी धरणाजवळ जाऊन आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. चक्काजाम आंदोलनात हजारो पूरग्रस्तांनी सहभागी होत लढ्याचा निर्धार व्यक्त केला तर शिरोळकरांनी तालुका बंद ठेवून आंदोलनाला पाठबळ दिले.
कोल्हापूर-सांगली जिल्ह्याला याआधी अनेकदा महापुराचा फटका बसला आहे. याला कर्नाटकातील अलमट्टी धरण कारणीभूत असल्याचा निष्कर्ष स्थानिकांनी काढलेला आहे. आता कर्नाटक शासन धरणाची उंची आणखी पाच मीटरने वाढवून ती ५२४ मीटर केली जाणार असल्याने महापुराच्या तीव्रतेत आणखी भर पडणार आहे. परिणामी कृष्णाकाठी असलेल्या शेतकरी, जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे कर्नाटक शासनाच्या या भूमिकेविरोधात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी, पूरग्रस्त नागरिकांनी शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनाला सक्रिय पाठबळ देत दोन्ही जिल्ह्यांतील पूरग्रस्त नागरिक, शेतकरी हजारो संख्येने सहभागी होत कर्नाटक शासनाच्या विरोधात संघर्ष करण्याचा इरादा व्यक्त करीत होते. शिरोळ तालुक्यात अर्धा दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळपासूनच तालुक्यातील सर्व व्यवहार बंद होते. गावोगावी वाहनातून नागरिक पूरग्रस्त कोल्हापूर- सांगली मार्गावरील चक्काजाम आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक तीन तास विस्कळीत झाली होती.
महापुराचा धोका वाढणार असल्याने अलमट्टीपर्यंत जाऊन आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार विश्वजित कदम यांनी दिला. तर अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर सांगली, कोल्हापुरात नक्षलवादी तयार होतील, असे वक्तव्य खासदार धैर्यशील माने यांनी केले.
आंदोलनात खासदार विशाल पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अशोक माने, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार राजू आवळे, माजी आमदार उल्हास पाटील, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, पंचगंगा कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील, माजी अध्यक्ष रजनी मगदूम यांच्यासह सर्व पक्षाचे नेते सहभागी झाले होते.