कोल्हापूर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांचे आता बारसे झाले आहे . स्थानिक लोकांनी त्यांना इतिहासातील ‘सेनापती’, ‘सुभेदार’ व ‘बाजी’ अशी प्रसिद्ध नावे बहाल केली आहेत. प्रकल्प परिसरातील स्थानिक नागरिकांनी केलेले हे नामकरण चर्चेत आले असून यातून इतिहासातील गाजलेल्या व्यक्तिरेखांचे स्मरण आगळेवेगळे स्मरण घडवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सरदारांना दिलेल्या विविध पदव्यांचा यासाठी आधार घेण्यात आला आहे.या नावांमुळे स्थानिक लोकांचा वाघांशी असलेला आत्मीय संबंध अधिक दृढ झाला असून, संवर्धनाबरोबरच लोकसहभागाची भावना बळकट झाली आहे.‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात’ अधिवास करणाऱ्या आतापर्यंत ३ वाघांचे अस्तित्व दिसून आले आहे. शासकीय कागदपत्रांमध्ये व्याघ्र प्रकल्पातील वाघांना सांकेतिक क्रमांक देण्यात आले आहेत. मात्र पर्यटकांमध्ये वाघाविषयी आकर्षण निर्माण करण्यासाठी स्थानिक निसर्गप्रेमी, गाईड, आणि वनमजुरांकडून या वाघांसाठी वापरण्यात येणाऱ्या नावांना वन विभागाने स्वीकारले आहे.
सद्यपरिस्थितीत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तीन नर वाघ आहेत. यामध्ये २०१८ साली या व्याघ्र प्रकल्पात पहिल्या वाघाचे दर्शन घडले. त्याला ‘ एस.टी.आर. टी १ ‘ असा सांकेतिक क्रमांक देण्यात आला.यानंतर २०२३ साली कोल्हापूरच्या कडगाव वनपरिक्षेत्रात दुसरा वाघ आढळला. त्याला एस.टी.आर. टी २ असा सांकेतिक क्रमांक देण्यात आला. यानंतर कोल्हापूरच्या राधानगरी वन्यजीव अभयारण्यामध्ये २८ ऑक्टोबर २०२४ रोजी तिसरा वाघ आढळला. त्याला एस.टी.आर. टी ३ असा सांकेतिक क्रमांक देण्यात आला आहे.सध्या यातील एस.टी.आर. टी १ , एस.टी.आर. टी २ हे दोन वाघ चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये असून एस.टी.आर. टी ३ हा वाघ कोयना वन्यजीव अभयारण्यात आहे.
शासकीय कागदपत्रांमध्ये या वाघांची ओळख सांकेतिक क्रमांकानुसार नोंदविण्यात आली आहे. मात्र स्थानिक पातळीवर पर्यटकांमध्ये या वाघांविषयी आकर्षण निर्माण करण्यासाठी त्यांना ओळखीच्या भाषेत देण्याचा विचार पुढे आल्यावर या वाघांचे वरील नामकरण केले आहे. यानुसार एस.टी.आर. टी १ या वाघाला ‘ सेनापती ‘ तर एस.टी.आर. टी २ या वाघाला ‘ सुभेदार ‘ आणि एस.टी.आर. टी ३ या वाघाला ‘ बाजी ‘ असे नाव देण्यात आले आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार लढले. त्यामुळे या खोऱ्यात नांदणाऱ्या वाघांना स्वराज्यातील सरदारांची नावे बहाल केली आहेत.
एस.टी.आर. टी १ हा सर्वप्रथम व्याघ्र प्रकल्प झाल्याने लढाईत ज्याप्रमाणे सेनापती सर्वात पुढे असतो त्याप्रमाणे हा आढळल्याने त्यावरून या वाघाला हे नाव देण्यात आले आहे.
‘ ऑपरेशन तारा’
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पेंच व्याघ्र प्रकल्प व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून दोन वाघीण आणण्यात येणार आहेत. याला ऑपरेशन ‘तारा’ असे नाव देण्यात आले आहेत. ऑपरेशन ‘तारा’ सारख्या शास्त्रीय मार्गदर्शनाखाली राबविलेल्या उपक्रमांमुळे संवर्धनाला नवी ऊर्जा मिळणार आहे. ‘ ऑपरेशन तारा’ या विशेष उपक्रमांतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प येथून वाघीण सह्याद्रीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या मोहिमेमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जैवविविधतेला चालना मिळून वाघांच्या संख्येत शाश्वत वाढ होईल.
पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा शासनाचा एक महत्वकांकशी व्याघ्र प्रकल्प आहे, जो सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये विस्तारलेला आहे. वाघांबरोबर येथील जैविविधता यांचे रक्षण होणार आहे. पर्यायाने येथील जल स्तोत्र शाबूत व सुरक्षित राहतील , तर जंगले, वन्यजीव वाचणार आहेत. या निर्णयामुळे वन्यजीव संरक्षणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले जात आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील या वाघांना स्थानिक लोकांनीच ही लोकप्रिय नावे दिली आहेत. यामुळे वाघांबाबत जनजागृती वाढते, त्यांच्याशी आत्मीय नातं जुळतं आणि संवर्धनाच्या कामाला नवी गती मिळते. ‘सेनापती’, ‘सुभेदार’ आणि ‘बाजी’ ही नावे सह्याद्रीच्या समृद्ध इतिहासाची व परंपरेची आठवण करून देतात.– तुषार चव्हाण, क्षेत्रसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूर.
‘ऑपरेशन तारा’ या विशेष मोहिमेतर्गत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दोन वाघिणी आणल्या जाणार आहेत. यातील पहिली वाघीण ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जैवविविधतेला चालना मिळून वाघांच्या संख्येत शाश्वत वाढ होईल.– किरण जगताप, उप संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोयना
वाघांना लोकांनीच नावे देणे हा सामाजिक सहभागाचा एक अनोखा प्रकार आहे. त्यामुळे वाघांबाबत आपुलकी वाढते, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील हा संगम भावी काळात संवर्धन, पर्यटन आणि जनजागृती या सर्वच दृष्टींनी महत्त्वाचा ठरणार आहे.- हन भाटे , मानद वन्यजीव रक्षक