बाबरी मस्जिद पाडण्यात आली त्यावेळी जबाबदारी घ्यायला भाजपचे कोणीही पुढे आले नाहीत. तेंव्हा भाजपची मंडळी कुठे लपून बसली होती, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना बुधवारी शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले.
करोनाच्या धर्तीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराचे ‘ई-भूमिपूजन’ व्हावे अशी सूचना मांडली होती. यावर चंद्रकांत पाटील यांनी रामजन्मभूमी मुक्त करण्यामध्ये भाजपचा मोठा वाटा आहे, पण शिवसेनेने काहीही न करता त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, अशी टीका केली होती.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष संजय पवार म्हणाले, की बाबरी मस्जिद पाडण्यात आली त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जबाबदारी घेतली होती. याचा आम्हा सर्व हिंदूंना सार्थ अभिमान आहे. त्यावेळी भाजपचे नेते कुठे लपून बसले होते? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.