Ajit Agarkar International Career Profile in marathi: भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या भारताच्या दिग्गज खेळाडूंचं पुनरागमन झाल्याने या वनडे मालिकेची जोरदार चर्चा आहे. पण याशिवाय भारताच्या निवड समितीचे प्रमुख अजित आगरकरदेखील सातत्याने चर्चेत आहेत. अजित आगरकरांच्या नेतृत्त्वाखालील निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिकेसाठी रोहित शर्माच्या जागी भारताच्या वनडे संघाचे कर्णधारपद शुबमन गिलकडे दिलं. रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर आगरकर सातत्याने चर्चेत आहेत. यादरम्यान त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीचा आणि यादरम्यानच्या अनोख्या विक्रमांचा आढावा घेऊया.
भारतीय संघाला लाभलेल्या कमालीच्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अजित आगरकरांच्या नावाचाही समावेश आहे. अजित आगरकर हे एक वेगवान गोलंदाज होते आणि त्याचबरोबर वेळप्रसंगी बॅट हातात घेऊन खालच्या फळीत महत्त्वपूर्ण धावा करणारा फलंदाज अशी भूमिकाही त्यांनी निभावली. गोलंदाजी, फलंदाजीबरोबरच एक उत्तम फिल्डर हेही त्यांचं गुणवैशिष्ट्य.
अजित आगरकरांची कसोटी कारकिर्द मर्यादित राहिली, पण वनडेमध्ये त्यांनी भारतासाठी उत्कृष्ट कामगिरी केली, याचा प्रत्यय आपल्याला आकड्यांवरून येतो. आगरकरांनी २६ कसोटी सामने, १९१ वनडे तर ४ टी-२० सामन्यांमध्ये संघाचं प्रतिनिधित्त्व केलं. अजित आगरकरांना चॉकलेट बॉय म्हणूनही ओळखलं जात असे. रवी शास्त्री यांनीही कॉमेंट्रीदरम्यान म्हटलं होतं की, “तो भारतीय क्रिकेट संघाचा चॉकलेट बॉय आहे, पण एखाद्या यौद्धाप्रमाणे तो खेळतो.”
मुंबईच्या मैदानावर फलंदाज म्हणून सुरूवात करणाऱ्या आगरकरांना ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सरांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. हा मुलगा उत्तम गोलंदाज होऊ शकतो हे सरांनी हेरलं आणि त्याला गोलंदाजीवर लक्ष क्रेंद्रित करण्यास सुचवलं आणि नंतर ते भारताचे आघाडीचे वेगवान गोलंदाज म्हणून ओळखले जाऊ लागले.
काटक शरीरयष्टी, साधारण वेग, जादुई स्विंगही नाही मात्र तरीही अचून लाईन लेंग्थसह वेगवान गोलंदाजी करत फलंदाजांनी बुचकळ्यात पाडण्याची क्षमता मात्र आगरकरांच्या गोलंदाजीत होती. खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन संघासाठी महत्त्वपूर्ण धावा करणारा विश्वसनीय खेळाडू अशी ओळखही त्यांनी निर्माण केली. आगरकरांच्या फलंदाजी क्षमतेचा प्रत्यय देण्यासाठी त्यांचं लॉर्ड्सवरील कसोटी शतक पुरेसं आहे.
लॉर्ड्सवरील ऐतिहासिक कसोटी शतक
लॉर्ड्स मैदानाला क्रिकेटची पंढरी मानलं जातं आणि या मैदानावर खेळताना शतक झळकावणं हे अनेक खेळाडूंचं स्वप्न असत. ज्या मैदानावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, एबी डीविलियर्स, जॅक कॅलिस यांसारखे महान फलंदाज शतकी खेळी करण्यास अपयशी ठरले, त्या मैदानावर एक गोलंदाज असूनही उत्तम फलंदाजी करणाऱ्या आगरकरांनी मात्र शतक झळकावलं आणि ऑनर्स बोर्डवर आपलं नाव कोरलं.
२००२ मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर होता, ढगाळ वातावरण आणि स्विंगला अनुकूल खेळपट्टीवर फलंदाजी करणं विदेशी फलंदाजांसाठी खेळणं आव्हान देणारं होतं. या खेळपट्टीवर इंग्लंडने दोन्ही डावांत उत्कृष्ट कामगिरी करत भारतीय संघासमोर ५६८ धावांचं लक्ष्य ठेवलं. यादरम्यान खेळताना आगरकरांनी १६ चौकारांसह नाबाद १०९ धावांची खेळी केली. आगरकरांनी शतकी खेळीच्या जवळ असताना संघाची स्थिती ९ बाद ३७० अशी होती. भारताने हा कसोटी सामना गमावला असला तरी आगकरांचं हे कसोटी शतक मात्र सर्वांच्या कायम लक्षात राहणारं ठरलं.
अॅडलेड कसोटीतील सहा विकेट्स
भारतीय संघासाठी ऑस्ट्रेलियात कसोटी जिंकणं हे खडतर मानलं जायचं. दरम्यान २०००-०३ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने अॅडलेस कसोटी सामन्यात रोमहर्षक विजय मिळवला होता. भारताच्या या विजयाचा नायक राहुल द्रविड होते. पण द्रविडसह अजित आगरकरांनीही विजयात मोलाचं योगदान दिलं होतं.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५५६ धावा केल्या. तर भारतीय संघाने राहुल द्रविडची २३३ धावांची उत्कृष्ट खेळी आणि वीवीएस लक्ष्मण यांच्या १४८ धावांच्या खेळीच्या जोरावर ५२३ धावांचा डोंगर उभारत जशास तसं उत्तर दिलं. दरम्यान ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात फक्त १९६ धावांवर ऑल आऊट केलं. ज्यात मोठी भूमिका आगरकरांना बजावली. आगरकरांनी यादरम्यान ४१ धावा देत ६ फलंदाजांचे बळी घेतले होते.
सात भोपळ्यांचा अनोखा विक्रम
लॉर्ड्सवरील दिमाखदार शतक, वनडेत फास्टेस्ट फिफ्टी असे काही विक्रम आगरकरांच्या नावावर आहेत. पण एक नकोसा विक्रमही आगरकरांच्या नावे आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध सलग सात वेळेस शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढवली होती. एडलेड, मेलबर्न, सिडनी, मुंबई अशा चार कसोटी सामन्यांमध्ये मिळून आगरकरांना सात वेळा भोपळाही फोडता आला नाही. डॅमियन फ्लेमिंग (1), ब्रेट ली(2), मार्क वॉ (2), ग्लेन मॅकग्रा (1), शेन वॉर्न (1) यांनी आगरकरांना एकही धाव घेण्याची संधी दिली नाही.
अजित आगरकरांच्या नावे असलेले विक्रम अन् मैलाचे दगड
१. भारतीय खेळाडू म्हणून वनडेत सर्वात कमी चेंडूत अर्धशतक झळकावण्याचा विक्रम आजही अजित आगरकरांच्या नावावर आहे. १४ डिसेंबर २००० रोजी राजकोटमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या वनडेत आगरकरांनी २१ चेंडूतच अर्धशतकाची नोंद केली.
२. वनडेत सर्वात वेगवान ५० विकेट्स घेण्याचा विक्रम तब्बल ११ वर्षे आगरकरांचा नावे होता. त्यांनी २३ सामन्यांमध्ये ५० विकेट्स घेण्याचा विक्रम १९९८ मध्ये हरारेमध्ये झिम्बाब्वेविरूद्ध सामन्यात केला होता. आता हा विक्रम श्रीलंकेच्या अजंथा मेंडिसच्या नावावर आहे. त्याने १९ वनडेत ५० विकेट्सची नोंद केली होती.
३. अजित आगरकरांची फलंदाजी पाहून त्यांना पिंच हिंटर म्हणून पाठवण्याचा प्रयोग करण्यात आला. ६ नोव्हेंबर २००२ मध्ये झालेल्या वेस्ट इंडिजविरूद्ध सामन्यात युवराज सिंग, मोहम्मद कैफ, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मणसारखे फलंदाज असतानाही आगरकरांना तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची बढती देण्यात आली होती. त्यावेळेस आगरकरांनी १०२ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांसह ९५ धावांची खेळी केली.
४. आगरकरांची आयपीएल कारकिर्द २००८ ते २०१३ म्हणजेच ५ वर्षे होती. यादरम्यान आगरकर दिल्ली डेअरडेव्हिल्स (आताचे दिल्ली कॅपिटल्स) व कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होते आणि त्यांनी २९ विकेट्सही घेतले. पण त्यांच्या फलंदाजीचा उपयोग मात्र आयपीएल संघांना करून घेता आला नाही.
५. २००७ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने पहिला टी-२० विश्वचषक पटकावला, त्या विश्वविजेत्या संघाचा अजित आगरकरही भाग होते. न्यूझीलंडविरूद्ध आगरकरांच्या गोलंदाजीवर ४० धावा कुटल्या आणि फलंदाजीत तो काही फारशी कामगिरी करू न शकल्याने त्याच्या जागी जोगिंदर शर्माला प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील केलं.
६. तब्बल ४२व्यांदा रणजी स्पर्धेचं जेतेपद पटकावलेल्या मुंबई क्रिकेट संघाचा अजित आगरकर भाग होते. २०१३ मध्ये मुंबईच्या रणजी ट्रॉफी विजेत्या संघाचा ते भाग होते. पहिल्या सत्रात साधारण कामगिरी राहिलेल्या मुंबईने दुसऱ्या सत्रात चमकदार कामगिरी केली. दुसऱ्या सत्रात आगरकरने अष्टपैलू कामगिरी बजावली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अजित आगरकरांनी मुंबई संघाच्या निवड समितीचे प्रमुख म्हणून काम पाहिलं.
