Akash Deep Sister Reaction on His Cancer Fight Speech: भारताचा वेगवान गोलंदाज आकाशदीप भारताच्या एजबेस्टनमधील कसोटी विजयाचा नायक ठरला. आकाशदीपने या सामन्यात १० विकेट्स घेतले. ज्यामध्ये त्याने पहिल्या डावात ४ विकेट्स आणि दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेत इंग्लंडच्या फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरला. आकाशदीपने त्याची सर्व कामगिरी आणि भारताचा विजय हा बहिणीला समर्पित केला, जी गेल्या २ महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत आहे. आकाशदीपच्या सामन्यानंतरच्या वक्तव्यावर त्याच्या बहिणीने प्रतिक्रिया दिली.

सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींप्रमाणे आकाशदीपचं कुटुंबही भारताचा ऐतिहासिक विजय पाहत होते. भारताच्या विजयानंतर खेळाडूंचा आनंद साजरं करणं आणि त्यांच्या प्रतिक्रिया आकाशदीपचं कुटुंब पाहत होतं. तितक्यात आकाशदीप त्याच्या कामगिरीबाबत मुलाखत देण्यासाठी पुढे आला आणि त्याचं बोलणं ऐकताच त्याची बहिण अखंड ज्योतीच्या डोळ्यात अश्रू तरळले. आकाशदीपने त्याची कामगिरी आपल्या बहिणीला समर्पित केली. याबद्दल आता त्याच्या बहिणीने प्रतिक्रिया दिली आहे.

“आम्ही सर्वजण भारताच्या विजयानंतर प्रझेंटेश सेरेमनी पाहत होतो, तेव्हा मी त्याला माझ्या कर्करोगाशी लढण्याबद्दल आणि तब्येतीबाबत बोलताना ऐकल. मी कधीच कल्पना केली नव्हती की तो याबद्दल सार्वजनिकरित्या बोलेल. त्याने भावनेच्या भरात ते सांगितलं,” हे सांगताना आकाशदीपच्या बहिणीच्या डोळ्यात अश्रू होते. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत तिने ही माहिती दिली.

सहा भावंडांमध्ये थोरली बहिण असलेल्या अखंड ज्योतीचं धाकटा भाऊ आकाशदीपशी खूप घट्ट नातं आहे. २०१५ मध्ये त्यांचे बाबा रामजी सिंग जे शिक्षक होते आणि त्यांचा भाऊ धीरज सिंग यांचं निधन झालं. “या दोघांच्याही मृत्यूनंतर आकाश आणि माझं नातं अधिक घट्ट झालं. स्टेजवर अचानक माझ्या तब्येतीबद्दल बोलताना त्याच्या मनात काय सुरू होतं, याबद्दल मला कल्पना नाही पण तो भावूक होत मनापासून ते बोलला”, असं त्याची बहिण पुढे म्हणाली.

आकाशदीपची बहिण अखंड ज्योतीच्या कर्करोग निदानाबद्दल त्याचं कुटुंब काही निवडक लोक आणि आकाशदीपच्या काही संघातील खेळाडूंना माहिती होतं. मंगळवारी सकाळी जेव्हा आम्ही व्हीडिओ कॉलवर त्याच्याशी बोललो. तेव्हा आम्ही त्याला विचारलं की त्याने स्टेजवर माझ्या आजाराबद्दल अचानक का सांगितलं. त्याने काहीच उत्तर दिलं नाही. तो म्हणाला मी बोलून गेलो कारण मला ते माझ्या मनात ठेवता येत नव्हतं. तो प्रेमापोटी पटकन बोलून गेला. सामन्यातील एवढ्या अटीतटीच्या वेळीही तो माझा विचार करत होता.

आकाशदीपच्या बगिणीचं २००८ मध्ये नितीश कुमार याच्याशी विवाह झाला. नितीश कुमार हे रिटायर्ड आर्मी सैनिक आहेत आणि आता ते लखनौमध्ये बँकेत काम करतात. त्यांचं कुटुंब नुकतंच नव्या घरी राहण्यासाठी शिफ्ट झाले आहेत. आकाशदीपची बहिण ज्योती ही ३ मुलांची आई आहे. तिला २ महिन्यांपूर्वी आतड्यांच्या कर्करोगाचं निदान झालं. तिचा कर्करोग हा तिसऱ्या स्टेजचा आहे. तिच्यावर नुकतीच दिल्लीमध्ये शस्त्रक्रिया झाली आणि आता केमोथेरपी सुरू आहे. तिच्या कुटुंबांनी दिलेल्या माहितीप्रमाणे तिची प्रकृती आता स्थिर आहे.