Arjun Tendulkar Income Luxury Houses: भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकर सध्या चर्चेचा विषय आहे. सचिनच्या लेकाचा साखरपुडा झाल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अर्जुनने बालपणीची मैत्रीण सानिया चंडोक हिच्याशी साखरपुडा केल्याचे म्हटले जात आहे. सानिया चंडोक ही उद्योजक रवी घई यांची नात आहे.

अर्जुन तेंडुलकर आणि सानियाचा साखरपुडा खाजगी समारंभात पार पडल्याचं म्हटलं जात आहे, जिथे दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि निवडक मित्र परिवार उपस्थित होता. दरम्यान तेंडुलकर किंवा घई कुटुंबियांपैकी कोणीही याबाबत अधिकृच माहिती दिलेली नाही.

डावखुरा वेगवान गोलंदाज आणि खालच्या फळीतील फलंदाज असलेला अर्जुन तेंडुलकर, त्याचे वडील सचिन तेंडुलकर यांच्यासारखाच लहानपणापासूनच क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याकडून खेळतो आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जुनची एकूण संपत्ती सुमारे २२ कोटी रुपये आहे. त्याच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत आयपीएल आहे.

आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधून किती कमावतो सचिनचा लेक?

अर्जुनला पहिल्यांदा २०२१ मध्ये मुंबई इंडियन्सने त्याच्या मूळ किमतीला २० लाख रुपयांना खरेदी केले होते. पुढच्या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये मुंबईने त्याला पुन्हा ३० लाख रुपयांना संघात कायम ठेवले. तेव्हापासून अर्जुन या संघाचा भाग आहे. गेल्या पाच वर्षांत अर्जुनने आयपीएलमधून सुमारे १ कोटी ४० लाख रुपये कमावले आहेत.

अर्जुन देशांतर्गत क्रिकेटमधून देखील चांगली कमाई करतो. तो रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धांमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व करतो. अर्जुन या स्पर्धांमधून दरवर्षी सुमारे १० लाख रुपये कमावतो. त्याचे एकूण वार्षिक उत्पन्न सुमारे ५० लाख रुपये आहे, त्यापैकी ७५-८० टक्के आयपीएलमधून आणि उर्वरित २०-२५ टक्के देशांतर्गत क्रिकेटमधून कमाई तो करतो.

लंडनमध्ये लॉर्ड्सजवळ आहे तेंडुलकर कुटुंबाचं घर

अर्जुन तेंडुलकर त्याचे वडील सचिन आणि कुटुंबासह मुंबईतील एका आलिशान भागात असलेल्या बंगल्यात राहतो. हे घर ६००० चौरस फूट क्षेत्रात पसरलेले आहे, ज्यामध्ये अनेक मजले, दोन तळघर आणि एक सुंदर टेरेस आहे. या घरात मोठी बाग, एक आधुनिक लिव्हिंग रूम आणि आलिशान डायनिंग एरियादेखील आहे. तेंडुलकर कुटुंबिय त्यांच्या घरातील अनेक फोटो शेअर करत असतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सचिनने हा बंगला २००७ मध्ये ३९ कोटी रुपयांना खरेदी केला होता. सध्याच्या घडीला या बंगल्याची किंमत जवळपास १०० कोटींच्या घरात आहे.

मुंबईतील घराशिवाय सचिन तेंडुलकरचं लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानाजवळ एक शानदार अपार्टमेंट आहे. तेंडुलकर कुटुंबिय अनेकदा सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी याठिकाणी राहतात. सचिनची क्रिकेट अकादमी देखील याच भागात आहे, जिथे अर्जुन सराव करतो.