Asia Cup 2023 Final India vs Sri Lanka : आशिया चषक २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका हे दोन संघ एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. कोलोंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा, परंतु, त्याचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याने पहिल्याच षटकात सलामीवीर कुसल परेरा याला पव्हेलियनचा रस्ता दाखवत दंड थोपटले. तर पुढच्याच काही षटकांमध्ये मोहम्मद सिराजने श्रीलंकेचा अर्धा संघ तंबूत धाडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह या तीन गोलंदाजांनी अवघ्या १५.२ षटकांत श्रीलंकेचे सर्व फलंदाज बाद केले. श्रीलंकेला केवळ ५० धावा जमवता आल्या. मोहम्मद सिराजने या सामन्यात ७ षटकांत २१ धावा देत ६ बळी घेतले. तर हार्दिक पांड्याने २.२ षटकांत ३ धावा देत ३ बळी घेतले. जसप्रीत बुमराहने एक बळी घेतला.

१५.२ षटकांत श्रीलंकेला सर्व गड्यांच्या बदल्यात केवळ ५० धावांपर्यंत मजल मारता आली. भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी, या वर्षी जानेवारीमध्ये भारताने श्रीलंकेला २२ षटकांत ७३ धावांत गुंडाळलं होतं. इतकंच नव्हे तर भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात कोणत्याही संघाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी बांगलादेशने २०२४ मध्ये मीरपूरमध्ये भारताविरुद्ध ५८ धावा केल्या होत्या. ५० धावा ही कोणत्याही एकदिवसीय स्पर्धेच्या अंतिम फेरीतील सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी भारतीय संघ २००० साली शारजाहमध्ये श्रीलंकेविरुद्ध ५४ धावांत ऑल-आऊट झाला होता. भारताचा हा लाजिरवाना विक्रम आज श्रीलंकेने मोडला आहे.

मोहम्मद सिराजने या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजीचं दर्शन घडवलं. त्याने तब्बल सहा बळी घेतले. यापैकी चार बळी त्याने एकाच षटकात घेतले. सिराजने सामन्यातील चौथ्या आणि वैयक्तिक दुसऱ्याच षटकात ही कामगिरी केली. एकाच षटकात चार बळी घेण्याचा विक्रम सिराजने नोंदवला. ४९ वर्षांच्या भारताच्या एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या भारतीय गोलंदाजाने एका षटकात चार बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. सिराजने उत्कृष्ट गोलंदाजी केली, ६ बळी घेतले, परंतु, त्याला एक विक्रम मोडता आला नाही.

हे ही वाचा >> IND vs SL : श्रीलंकेविरुद्ध मोहम्मद सिराजचं वादळ, सामना सुरू होताच संपवला, कोणत्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम

एकाच एकदिवसीय सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा, सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम मध्यमगती गोलंदाज स्टुअर्ट बिनीच्या नावावर आहे. त्याने २०१४ मध्ये मीरपूर येथे बांगलादेशविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात ६ षटकांत ४ धावा देत ६ बळी घेण्याचा पराक्रम केला होता. हा विक्रम आधी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेच्या नावावर होता. अनिल कुंबळेने १९९३ मध्ये कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यात ६ षटकांत १२ धावा देत ६ बळी घेतले होते. या यादीत सिराजने तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्याने आजच्या सामन्यात ६ षटकांत २१ धावा देत ६ बळी घेतले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup 2023 final ind vs sl mohammed siraj took 6 wikets but missed to break stuart binny record asc