Axar Patel Injury Update: आशिया चषक २०२५ स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना भारत आणि ओमान या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ओमानविरूद्ध जिंकण्यासाठी १८९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना १६७ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह भारतीय संघाने स्पर्धेतील तिन्ही सामने जिंकून गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम ठेवलं. लवकरच सुपर ४ फेरीतील सामन्यांना सुरूवात होणार आहे. दरम्यान या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना संघातील अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाला होता. सामन्यानंतर संघाचे प्रशिक्षक टी दिलीप यांनी अक्षर पटेलच्या दुखापतीबाबत महत्वाची अपडेट दिली आहे.
भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल गोलंदाजी, फलंदाजीसह क्षेत्ररक्षणातही मोलाचं योगदान देत असतो. पण या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना त्याला दुखापत झाली. शिवम दुबेच्या गोलंदाजीवर हमद मिर्झाने मोठा फटका मारला. त्यावेळी अक्षर पटेलने झेल घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा अंदाज थोडक्यात हुकला. त्यामुळे तोल गेल्याने त्याच्या डोक्याला दुखापत झाली. दुखापतग्रस्त होताच त्याला मैदान सोडून बाहेर जावं लागलं. भारतीय संघाच्या विजयानंतर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी अक्षर पटेलच्या दुखापतीबाबत महत्वाची अपडेट दिली. ते म्हणाले, “सामना झाल्यानंतर अक्षर पटेल फिट असल्याचं दिसून येत होतं.”
प्रशिक्षकाने दिली मोठी अपडेट
सामना झाल्यानंतर टी दिलीप यांनी अक्षर पटेलच्या फिटनेसबाबत अपडेट दिली. ते म्हणाले, “मी आता पाहिलं अक्षर पटेल फिट असल्याचं दिसून येत आहे. मी सध्या तरी इतकंच सांगू शकतो.” टी दिलीप यांच्या सांगण्यावरून तरी हेच वाटत आहे की, अक्षर पटेलला झालेली दुखापत फार गंभीर नाही. त्यामुळे पाकिस्तानविरूद्ध होणाऱ्या सामन्यात तो खेळताना दिसून येऊ शकतो. रविवारी होणारा सामना हा भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. साखळी फेरीतील सामने झाल्यानंतर आता सुपर ४ फेरीतील सामन्यांना सुरूवात होणार आहे. भारताचा सुपर ४ फेरीतील पहिला सामना पाकिस्तानविरूद्ध होणार आहे.
तसेत टी दिलीप यांनी भारत- पाकिस्तान सामन्याबद्दलही मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “आमच्यासाठी हा सामना नेहमीसारखाच असणार आहे. आम्ही आमच्या कट्टर प्रतिस्पर्धी संघाविरूद्ध भिडण्यासाठी पुन्हा एकदा तयार आहोत.” हा सामना २१ सप्टेंबरला रंगणार आहे. याआधी दोन्ही संघ १४ सप्टेंबरला आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळ केला होता. या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली होती. आता सुपर ४ मध्येही भारतीय संघ दमदार कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.