Saim Ayub Unwanted Record: आशिया चषक २०२५ स्पर्धेत पाकिस्तानने युएईला पराभूत करत सुपर ४ मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे सुपर ४ मध्ये पुन्हा एकदा भारत – पाकिस्तान सामना पाहायला मिळणार आहे. पाकिस्तान संघाचं भविष्य मानला जाणारा सलामीवीर फलंदाज सईम अयुब या संपूर्ण स्पर्धेत फ्लॉप ठरला आहे. पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूंनी या खेळाडूचं तोंडभरून कौतुक केलं होतं. बुमराहला षटकार पाहण्याची स्वप्न पाहणाऱ्या या फलंदाजाला आशिया चषक स्पर्धेत खातंही उघडता आलेलं नाही. सलग ३ सामन्यांमध्ये हा फलंदाज ३ वेळेस शून्यावर माघारी परतला आहे.
पाकिस्तानने डोक्यावर घेतलेल्या फलंदाजाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण ३ सामन्यांमध्ये तो एक धाव सुद्धा करू शकलेला नाही. यासह त्याच्या नावे नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. यासह सर्वाधिक वेळेस शून्यावर बाद होणारा पाकिस्तानचा संयुक्तरित्या दुसरा फलंदाज ठरला आहे. या विक्रमात त्याने शाहिद आफ्रिदीची बरोबरी केली आहे. दोघेही टी -२० क्रिकेटमध्ये ८-८ वेळेस शून्यावर बाद झाले आहेत. तर सर्वाधिक वेळेस शून्यावर बाद होण्याचा विक्रम आपल्या नावावर करण्यापासून तो ३ पाऊल दूर आहे.
अव्वल स्थानी कोण?
पाकिस्तानकडून सर्वाधिक वेळेस शून्यावर बाद होण्याचा विक्रम हा माजी खेळाडू उमर अकमलच्या नावावर आहे. त्याला २००९ ते २०१९ या कालावधीत ८४ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान तो १० वेळेस शून्यावर बाद झाला आहे. जर सईम अयुब आणखी ३ वेळेस शून्यावर बाद झाला, तर तो हा विक्रम मोडून काढू शकतो.
सईम अयुब हा तोच फलंदाज जो बुमराहच्या गोलंदाजीवर ६ षटकार मारणार असं म्हटलं जात होतं. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू तनवीर अहमदने असा दावा केला होता की, अयुब भारतीय संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर ६ षटकार मारू शकतो. आता ३ वेळा शून्यावर बाद झाल्यावर त्याला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. २३ वर्षीय सईम अयुबला आतापर्यंत ४४ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने २०.४० च्या सरासरीने ८१६ धावा केल्या आहेत. ज्यात ९८ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.