Morne Morkel On Abhishek Sharma- Hardik Pandya Fitness: आशिया चषक २०२५ स्पर्धेतील सुपर ४ फेरीतील शेवटचा सामना भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये पार पडला. भारतीय संघाने आधीच अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. भारताचा अंतिम फेरीचा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. त्यामुळे हा सामना भारतीय संघासाठी सराव सामन्यासारखाच होता. या सामन्यात भारतीय संघाने आशिया चषक २०२५ स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या उभारली. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने भारतीय संघाची बरोबरी केली. त्यामुळे सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला.दरम्यान या सामन्यात भारतीय संघाला २ मोठे धक्के बसले. अभिषेक शर्मा आणि हार्दिक पंड्या दोघांनाही दुखापतीमुळे मैदान सोडून जावं लागलं होतं. दरम्यान सामना झाल्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केलने अंतिम सामन्याआधी दोघांच्याही फिटनेसबाबत अपडेट दिली आहे.
हार्दिक पंड्या या सामन्यात पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. त्याने पहिल्याच षटकात श्रीलंकेला मोठा धक्का दिला. त्याने कुसल मेंडिसला बाद करत माघारी धाडलं. हे षटक टाकल्यानंतर त्याला हॅम्स्ट्रिंगमुळे मैदान सोडावं लागलं. त्यानंतर तो मैदानावर परतलाच नाही. त्यामुळे इतर गोलंदाजांवर दबाव आला. तर दुसरीकडे भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माला देखील हॅम्स्ट्रिंग त्रास जाणवला. त्यामुळे १० व्या षटकात त्याला मैदान सोडून बाहेर जावं लागलं.
मॉर्ने मॉर्केल काय म्हणाला?
श्रीलंकेविरूद्धचा सामना झाल्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल म्हणाला, “सामन्यादरम्यान दोघांनाही ( हार्दिक आणि अभिषेक) क्रँपचा त्रास झाला. हार्दिकबाबत आम्ही आज रात्री आणि सकाळी पाहू आणि त्यानंतर निर्णय घेऊ.” दरम्यान अभिषेक शर्मा फिट असल्याचं मॉर्ने मॉर्केलने सांगितलं. ही भारतीय संघासाठी सकारात्मक बाब आहे. कारण अभिषेक शर्मा हा भारतीय संघातील एकमेव फलंदाज आहे जो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. गेल्या तिन्ही सामन्यांमध्ये त्याने चांगली कामगिरी करत लागोपाठ ३ अर्धशतकं झळकावली आहेत. पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यातही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
यासह पाकिस्तानविरूद्ध होणाऱ्या सामन्याआधी टीम मॅनेजमेंटने मोठा निर्णय घेतला आहे. हा सामना रविवारी होणार आहे. या सामन्याआधी शनिवारी भारतीय खेळाडू सराव करण्यासाठी मैदानात उतरणार नाहीत. हा भारतीय खेळाडूंसाठी रेस्ट डे असणार आहे. शु्क्रवारी भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्याचा निकाल हा सुपर ओव्हरमध्ये लागला. त्यामुळे अंतिम सामन्याआधी खेळाडूंना विश्रांतीची गरज असल्याचं मॉर्ने मॉर्केलने सांगितलं.