India vs Pakistan Playing 11 Prediction: आशिया चषक २०२५ स्पर्धेतील सुपर ४ फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारत- पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल होणार हे निश्चित आहे. कारण ओमानविरूद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल करण्यात आले होते. अबूधाबीच्या मैदानावर वेगवान गोलंदाजांना मदत मिळत होती. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना संधी दिली गेली होती. पण दुबईत फिरकी गोलंदाजांना मदत मिळते. त्यामुळे फिरकी गोलंदाजांचा समावेश केला जाऊ शकतो.
अक्षर पटेल खेळणार का?
या सामन्यात अक्षर पटेल खेळणार का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. ओमानविरुद्ध झालेल्या सामन्यात झेल घेत असताना अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मैदान सोडून बाहेर जावं लागलं होतं. त्यानंतर तो मैदानात येऊ शकला नव्हता. या सामन्यात त्याला १ षटक टाकण्याची संधी मिळाली. दरम्यान फलंदाजी करताना त्याने २६ धावांची खेळी केली होती.
अक्षर पटेल बाहेर झाल्यास कोणाला संधी मिळणार?
ओमानविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी अक्षर पटेलच्या फिटनेसबाबत अपडेट दिली होती. तो ठीक असल्याचं म्हटलं गेलं होतं. पण याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. जर अक्षर पटेल बाहेर झाला, तर हर्षित राणा किंवा अर्शदीप सिंगला प्लेइंग ११ मध्ये कायम ठेवले जाऊ शकते.
ओमानविरुद्ध झालेल्या भारतीय संघात बदल करण्यात आले होते. संघातील प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांना विश्रांती देण्यात आली होती. आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात या दोन्ही खेळाडूंचं पुनरागमन होणार हे निश्चित आहे. भारताच्या गोलंदाजी आक्रमणात बदल होऊ शकतो. पण फलंदाजीक्रमात कुठलाही बदल होण्याची शक्यता कमी आहे. कारण सर्व फलंदाज दमदार फॉर्ममध्ये आहेत.
या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:
शुबमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव ( कर्णधार), संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल/ अर्शदीप सिंग/ हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.