Suryakumar Yadav Statement on Sanju Samson Playing 11 Selection: आशिया चषक २०२५ ला आज ९ सप्टेंबरपासू सुरूवात आहे. भारतीय संघ १० सप्टेंबरला स्पर्धेतील पहिला सामना युएईविरूद्ध खेळणार आहे. आशिया चषकातील सामन्यांसाठी भारताची प्लेईंग इलेव्हन कशी असणार, यावर चाहत्यांच्या नजरा आहेत. शुबमन गिलला संघाचे उपकर्णधार पद दिल्याने आता संजू सॅमसन सलामीला उतरणार की नाही, याबाबत सूर्यकुमार यादवला पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला.
आशिया चषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्व कर्णधारांचं फोटोशूट करण्यात आलं. यानंतर आठही संघांचे कर्णधार पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते. यादरम्यान भारताच्या प्लेईंग इलेव्हनबाबत सूर्यकुमार यादवला प्रश्न विचारण्यात आला. संजू सॅमसन प्लेईंग इलेव्हनमध्ये असेल की नाही या प्रश्नावर कर्णधार सूर्यकुमार यादवने उत्तर दिलं आहे.
संजू सॅमसनला आशिया चषकासाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार की नाही?
आशिया चषकात शुबमन गिल अभिषेक शर्माबरोबर सलामीला उतरेल हे जवळजवळ निश्चित आहे आणि मधल्या फळीत संजूची कामगिरी काही खास राहिलेली नाही. पत्रकार परिषदेत जेव्हा सूर्यकुमार यादवला संजू सॅमसनबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला की, “मी तुम्हाला प्लेइंग इलेव्हनचा मेसेज करतो. आम्ही त्याची खूप काळजी घेत आहोत. तुम्ही काळजी करू नका. प्लेईंग इलेव्हनबाबत उद्या आम्ही योग्य निर्णय घेऊ.”
संजूबाबतचा प्रश्न ऐकताच सूर्यकुमार यादव उत्तर देण्यापूर्वी हसू लागला आणि त्याला हसताना पाहून सर्वच कर्णधार एकदम हसू लागले. सूर्याने संपूर्ण उत्तरही हसत हसत दिलं. सूर्यादादाच्या या उत्तराने संजूला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळणं अवघड असल्याचं चाहते म्हणत आहेत.
टीम इंडियाने २०२५ मध्ये जानेवारीत शेवटची टी-२० मालिका खेळली होती. त्या मालिकेत संजू सॅमसनने अभिषेक शर्माबरोबर डावाची सुरुवात केली होती. पण गिलच्या टी-२० संघातील पुनरागमनाने त्याच्या जागेबद्दल मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. दरम्यान संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून जितेश शर्माला संधी देण्यात आली आहे. जितेशने यष्टीरक्षणासह फिनिशर म्हणून खालच्या फळीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
आशिया चषकासाठी भारताचा संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरूण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित राणा, रिंकू सिंह