Australia vs Pakistan ICC Cricket World Cup 2023 Match Updates: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील १८वा सामना शुक्रवारी बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते. हा सामना ऑस्ट्रेलिया संघाने ६२ धावांनी जिंकला. या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड वार्नर आणि आणि मिचेल मार्शच्या भागीदारीच्या जोरावर ९ गडी गमावून ३६७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ ४५.३ षटकांत ३०५ धावांवर आटोपला.

यासह कांगारू संघाने स्पर्धेतील सलग दुसरा विजय नोंदवला आहे. त्याचबरोबर या विश्वचषकात पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी भारताविरुद्धही पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता ऑस्ट्रेलियन संघ गुणतालिकेत अव्वल चार संघांमध्ये सामील झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ॲडम झाम्पाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर डेव्हिड वार्नर १६३ आणि मिचेल मार्शने १२१ धावांचे योगदान दिले. डेव्हिड वार्नरला त्याच्या वादळी खेळीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

३६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तान संघानेही दमदार सुरुवात केली. अब्दुल्ला शफीक आणि इमाम-उल-हक यांच्यात पहिल्या विकेटसाठी १३४ धावांची शानदार भागीदारी साकारली. शफीकने ६४ धावांची तर इमामने ७० धावांची खेळी खेळली. या दोघांशिवाय मोहम्मद रिझवानने ४६ धावांची, सौद शकीलने ३० धावांची आणि इफ्तिखार अहमदने २६ धावांची खेळी खेळली.

याशिवाय एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. पाकिस्तानची फलंदाजी पाहून त्यांचा संघ लक्ष्य गाठू शकेल असे वाटत होते, मात्र ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज ॲडम झाम्पाने हे होऊ दिले नाही. ॲडम झाम्पाने १० षटकांत ५३ धावा देत ४ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. झाम्पाने बाबर आझम, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान आणि मोहम्मद नवाज यांची विकेट घेत पाकिस्तानचे स्वप्न भंगले.

शाहीन आफ्रिदीने घेतल्या सर्वाधिक ५ विकेट्स –

ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला ३६८ धावांचे लक्ष्य दिले होते. ऑस्ट्रेलियासाठी दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी शतके झळकावली. डेव्हिड वॉर्नरने १६३ आणि मिचेल मार्शने १२१ धावा केल्या. या दोघांशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला २५ धावांचा पल्ला गाठता आला नाही. मार्कस स्टॉइनिसने २१ धावा केल्या. जोश इंग्लिशने १३ धावांचे योगदान दिले. मार्नस लाबुशेन आठ आणि स्टीव्ह स्मिथ सात धावा करून बाद झाला. पॅट कमिन्सने सहा आणि मिचेल स्टार्कने दोन धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेल आणि जोश हेझलवूड खातेही उघडू शकले नाहीत. ॲडम झाम्पा एक धाव काढून नाबाद परतला. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक ५ विकेट्स घेत्या. तसेच हरिस रौफने तीन विकेट्स घेतल्या आणि उसामा मीरने एक विकेट घेतली.