BCCI Announces 21 Cr Cash Prize For India Cricket Team: आशिया कप विजेत्या भारतीय क्रिकेट संघाला बीसीसीआयने २१ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. बीसीसीआयने जाहीर केले आहे की, आशिया कप विजेत्या भारतीय क्रिकेट संघाला आणि त्यांच्या कोचिंग स्टाफला स्पर्धेत त्यांच्या दमदार कामगिरीबद्दल २१ कोटी रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल.

“हा एक असामान्य विजय होता आणि म्हणूनच, उत्सव म्हणून, बीसीसीआयने आशिया कपमध्ये भारतीय संघाचा भाग असलेल्या खेळाडूंना आणि कोचिंग स्टाफला २१ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे”, असे बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.

“ही रक्कम सर्व खेळाडू आणि कोचिंग स्टाफच्या सदस्स्यांमध्ये वाटली जाईल आणि हे आमच्या संघासाठी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी आणि भारतीयांसाठी एक मोठी बक्षीस आहे. आमच्या क्रिकेटपटू आणि कोचिंग स्टाफच्या उत्कृष्ट कामगिरीचा आम्हाला खूप अभिमान आहे”, असेही सैकिया म्हणाले.

भारतीय संघाने आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ५ विकेट्सने दणदणीत पराभव केला. मात्र, आशिया चषकाची ट्रॉफी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वी यांच्या हस्ते स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे भारतीय संघाला ट्रॉफीशिवायच मायदेशी परतावे लागणार आहे.

“एसीसीने मला कळवले आहे की भारतीय संघ आज रात्री आपली पारितोषिके स्वीकारणार नाही. त्यामुळे हा पारितोषिक समारंभ इथेच संपतो”, असे सूत्रसंचालक सायमन डुल म्हणाले. फक्त अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि कुलदीप यादव यांनी आपापली वैयक्तिक पारितोषिकs घेतली, पण भारतीय संघाने एकत्रितपणे ट्रॉफी घेण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी व्यासपीठावर पाऊल ठेवले नाही.

भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानवर ५ विकेट्सने दणदणीत विजय मिळवत ९ व्यांदा आशिया चषक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला जोरदार टोला लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर एक पोस्ट केली. “ऑपरेशन सिंदूर असो किंवा खेळाचे मैदान निकाल एकच…. तो म्हणजे भारताचा विजय”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.