IND vs ENG Ben Stokes Ravindra jadeja Washington Sundar Video: भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. भारताच्या ४ फलंदाजांनी सलग पाच सत्र फलंदाजी करत कमालीची झुंज दिली आणि परिणामी इंग्लंडला विजय मिळवू न देता टीम इंडियाने सामना ड्रॉ केला. या सामन्यात अखेरच्या षटकांमध्ये मोठा ड्रामा पाहायला मिळाला. पण याशिवाय सामन्यानंतर दोन्ही संघातील खेळाडू जेव्हा एकमेकांना हात मिळवत होते, तेव्हाचा स्टोक्सचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
शुबमन गिल आणि केएल राहुल यांच्या १८८ धावांच्या भागीदारीनंतर जडेजा आणि सुंदरने कमालीची फलंदाजी करत शतकं झळकावली. राहुल आणि गिलच्या विकेटनंतर भारताचा डाव कोसळणार का, अशी चर्चा सुरू असताना पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सुंदरने जडेजाच्या साथीने २०३ धावांची भागीदारी रचली आणि इंग्लंडला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली नाही.
अखेरच्या षटकांमध्ये नेमकं काय घडलं?
सामन्यातील अखेरच्या षटकांमध्ये मोठा ड्रामा पाहायला मिळाला. कर्णधार बेन स्टोक्सने जडेजाबरोबर हात मिळवत सामना अनिर्णित राहून इथेच संपल्याचे जाहीर करूया. पण जडेजा आणि सुंदरने मात्र यासाठी नकार दिला, इतकंच काय तर भारताच्या ड्रेसिंग रूममधूनही सामना संपवण्यासाठी नकार आला. याचं कारण म्हणजे जडेजा आणि सुंदर शतकाच्या जवळ होते. पण हात मिळवण्यासाठी नकार दिल्याने स्टोक्स मात्र वैतागला होता. याचा राग त्याने सामना संपल्यानंतर आपल्या कृतीतून व्यक्त केला. ज्याचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे.
बेन स्टोक्स सोशल मीडियावर तुफान ट्रोल
रवींद्र जडेजाने षटकार लगावत त्याचं शतक पूर्ण केलं, तर पुढच्याच षटकात सुंदरने दोन धावा करत आपलं पहिलं कसोटी शतक झळकावलं. यानंतर लगेच भारताने हात मिळवत सामना संपल्याचं मान्य केलं. सर्व खेळाडूंना एकमेकांना हात मिळवत असताना बेन स्टोक्सने मात्र सुंदर आणि जडेजाला हात मिळवण्यास साफ नकार दिला. ते दोघे खेळाडू समोरून हात मिळवण्यासाठी हात पुढे करत होते, पण स्टोक्सने मात्र दुर्लक्ष केलं आणि जडेजाबरोबर बाचाबाची देखील त्याने केली.
स्टोक्सला या कृतीवरून मात्र आता ट्रोल केलं जात आहे. लॉर्ड्स कसोटीत शुबमन गिल आणि संघाने क्रॉल व डकेट यांना स्लेज केलं होतं. तेव्हा इंग्लंड खेळभावनेने खेळतो, असं स्टोक्स पत्रकार परिषदेत म्हणत भारताला चुकीचं म्हटलं होतं. पण आता सुंदर-जडेजाला हात मिळवण्यापासून नकार देत त्याने कोणती खेळभावना जपली आहे, असा प्रश्न चाहते विचारत आहेत.