IND vs NZ T20: टी-२० चा सामना होता की कसोटी? दोन्ही संघाकडून झाला टी-२० च्या इतिहासातील नकोसा विक्रम | Both teams fail to hit a six in a T20I in India for the first time in history | Loksatta

Ind vs NZ: टी-२० चा सामना होता की टेस्ट क्रिकेट? भारत आणि न्यूझीलंडकडून झाला इतिहासातील नकोसा विक्रम!

IND vs NZ T20: न्यूझीलंडने भारताविरोधातली सर्वात कमी धावसंख्या कालच्या सामन्यात केली. तर भारतालाही ही धावसंख्या गाठताना खूप संघर्ष करावा लागला.

Ind vs nz 2nd t20
Ind vs nz 2nd t20: भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या सामन्यात भारताचा चार विकेट राखून विजय

लखनऊ येथे भारत वि. न्यूझीलंड दरम्यान झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ६ गडी राखून विजय मिळवला. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. नाणेफेक जिंकून भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत आठ विकेट गमावून फक्त ९९ धावा केल्या. टी-२० चा सामना असूनही ही छोटीशी धावसंख्या गाठायला भारतीय फलदांजाच्या नाकी नऊ आले. शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर सुर्यकुमार यादवने चौकार मारून भारताला विजय प्राप्त करुन दिला. या सामन्यात टी-२० क्रिकेटला लाजवतील असे अनेक नकोसे विक्रम झाले आहेत. भारताच्या विरोधात न्यूझीलंडची आतापर्यंतची ही सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे. भारत-न्यूझीलंड दरम्यानचा अंतिम आणि निर्णायक सामना बुधवार, दि. १ फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

सामन्यात एकही षटकार लागला नाही

न्यूझीलंडने भारताविरोधातली सर्वात कमी धावसंख्या केली आहे. कालच्या सामन्यात फिन ऍलन आणि डेव्हॉन कॉनवे यांच्यात सर्वात मोठी २१ धावांची पार्टनरशिप झाली होती. तर भारताकडून सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांच्यामध्ये ३० धावांची पार्टनरशिप झाली. विशेष म्हणजे टी-२० सामना असूनही दोन्ही संघाकडून एकही षटकार ठोकण्यास दोन्हीही संघाना जमले नाही. संपूर्ण सामन्यात दोन्ही इनिंग्जचे मिळून २३९ चेंडू फेकले गेले. यामध्ये एकाही फलंदाजाला षटकार मारता आला नाही. याआधी २०२१ मध्ये बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यात २३८ चेंडूत एकही षटकार मारण्यात आला नव्हता. आता २३९ चेंडूत षटकार न मारता आल्याने या सामन्यात हा नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे.

फिरकीपटूंनी टाकल्या ३० ओव्हर्स

या सामन्यात दोन्ही संघाच्या फिरकीपटूंनी मिळून ३० ओव्हर्स टाकल्या. भारताकडून १३ तर न्यूझीलंडकडून १७ ओव्हर्स टाकण्यात आल्या. आतापर्यंतच्या टी-२० सामन्यात फिरकी गोलंदाजांनी एवढ्या ओव्हर्स एकाच सामन्यात टाकल्या नव्हत्या. हा देखील एक नवा विक्रम कालच्या सामन्यात घडला. याआधी बांगलादेश विरुद्ध पाकिस्तानच्या मिरपूर येथे झालेल्या टी-२० सामन्यात फिरकीपटूंकडून २८ ओव्हर्स टाकण्यात आल्या होत्या. तसेच न्यूझीलंडकडून १७ ओव्हर्स फिरकीपटूंनी टाकल्या. हा तृतीय क्रमांकाचा विक्रम ठरला आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यात एवढ्या ओव्हर्स फिरकीपटूंनी टाकण्याचा विक्रम झिम्बॉब्वे आणि पाकिस्तानच्या नावांवर आहे. २०१० आणि २०१२ साली दोन्ही संघानी आपल्या फिरकीपटूंना १८ ओव्हर्स टाकायला लावल्या होत्या.

भारतीय फिरकीपटूंनी सामन्यात रंगत आणली

भारत वि न्यूझीलंडच्या पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंड वरचढ ठरला होता. फिरकीपटूंच्या जीवावर त्यांनी एकहाती सामना जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने देखील युजवेंद्र चहलला संघात घेतले आणि भारतीय फिरकीपटूंनी सामन्यात रंगत आणली. फिरकीपटूंनी एकून चार विकेट घेतल्या. चहलने फिन ऍलनला क्लीन बोल्ड करुन विकेट्सची सुरुवात करुन दिली. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने डेव्हॉन कॉनवेला बाद केले. दोघेही ११ धावा करुन बाद झाले. तर अधूनमधून गोलंदाजी करणाऱ्या दीपक हुड्डानेही फिरकीचा कमाल दाखवत ग्लेन फिलिप्सला अवघ्या ५ धावांवर माघारी धाडले. यानंतर कुलदीप यादवने डॅरिल मिशेलला क्लिन बोल्ड करत केवळ आठ धावांवर रोखले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 08:32 IST
Next Story
रोहित, कोहलीबाबत संयम बाळगा! ‘आयसीसी’ची स्पर्धा न जिंकल्याने होणारी टीका थांबवण्याचे अश्विनचे आवाहन