आयपीएलमधून निलंबित करण्यात आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांना जीवदान मिळाले आहे. बीसीसीआयच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत या दोन्ही संघांना बरखास्त न करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
२०१३च्या आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाबाबत न्यायमूर्ती आर. एम. लोढा यांच्या अहवालानुसार चेन्नई आणि राजस्थान या दोन संघांना दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. मात्र, शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या या पहिल्या बैठकीत चेन्नई आणि राजस्थानला अभय मिळाले आहे. याव्यतिरीक्त २०१६च्या आयपीएलमध्ये दोन नव्या संघांचा समावेश केला जाणार असून, २०१८ मध्ये एकूण १० संघांमध्ये आयपीएलची रणधुमाळी पाहावयास मिळणार आहे.
तसेच, पुढील दोन वर्षांसाठी इंडियन प्रिमियर लीगचे प्रायोजकत्व चीनची मोबाईल कंपनी व्हायव्हो करणार आहे. पेप्सीने स्पॉन्सरशीप सोडल्यानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.