वृत्तसंस्था, सिडनी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत १-३ असा पराभव पत्करावा लागल्यानंतर भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने संघातील वरिष्ठांसह सर्वच खेळाडूंना कसोटी क्रिकेट खेळायचे असेल, तर आधी लाल चेंडूवर खेळण्याची तुमची प्रतिबद्धता सिद्ध करा आणि त्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभागी व्हा, असे आवाहन केले.

मालिका गमाविल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रशिक्षक गंभीरने एक प्रकारे खेळाडूंच्या पाच दिवसांचे सामने खेळण्याच्या प्रतिबद्धतेलाच आव्हान दिले. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची सर्वोत्तम कामगिरी करण्याची भूक अजूनही मोठी आहे. मात्र, ती उठून दिसत नाही. त्यामुळे त्यांच्यासह भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूंने लाल चेंडूविरुद्ध खेळण्याची आपली क्षमता पुन्हा सिद्ध करण्याची गरज आहे,’’ असे गंभीर म्हणाला.

रोहित आणि विराट यांच्या भविष्याबद्दल गंभीरने कोणतेही भाष्य केले नाही. ‘‘पाच महिन्यानंतर आपण कुठे असणार हे बोलण्याची ही योग्य वेळ नाही. खेळ आणि परिस्थिती कायम बदलत असतात. पाच महिने हा मोठा कालावधी आहे. तोपर्यंत संघ कसा असेल, हे आताच सांगणे योग्य नाही. जे काही होईल, ते भारतीय संघाच्या हिताचे असेल,’’ असे गंभीरने स्पष्ट केले.

हेही वाचा >>>IND vs AUS: “त्याचं काही घेणं देणं नव्हतं…”, गौतम गंभीरने सॅम कॉन्स्टासला सुनावले खडे बोल, जसप्रीतबरोबर घातला होता वाद

‘‘रणजी करंडक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला या महिन्याच्या अखेरीस सुरुवात होईल. प्रत्येक खेळाडूने देशांतर्गत क्रिकेट खेळावे. केवळ एकानेच नाही, तर भारतीय संघातून खेळणाऱ्या प्रत्येकाने आपल्या उपलब्धतेनुसार देशांतर्गत क्रिकेटला महत्त्व द्यायलाच हवे. शेवटी हे क्रिकेट खेळूनच तुम्ही पुढे आला आहात हे कसे विसरता येईल. देशांतर्गत क्रिकेटला महत्त्व मिळाले नाही, तर चांगले कसोटीपटू घडणारच नाहीत,’’ असे स्पष्ट मत गंभीरने या वेळी मांडले.

‘‘प्रशिक्षक म्हणून मला प्रत्येक खेळाडूला कशी समान वागणूक मिळेल याचा विचार करावा लागतो. ड्रेसिंग रुममध्ये मी केवळ एक-दोन खेळाडूंना महत्त्व दिले आणि इतरांशी फारसा संवाद साधत नसेन, तर मी माझ्या कामाशी अप्रामाणिक आहे असे मानतो. त्यामुळे पदार्पण करणारा असो किंवा शंभर कसोटी सामने खेळलेला, प्रत्येक खेळाडू माझ्यासाठी सारखाच आहे. असा दृष्टिकोन राखला, तरच संघात सकारात्मक वातावरण राहू शकते,’’ असेही गंभीर म्हणाला.

हेही वाचा >>>IND vs AUS: “आम्ही कोण? आम्हाला क्रिकेट थोडंच येतं…”, सुनील गावस्कर भारताच्या मालिका पराभवानंतर रोहित शर्मावर संतापले?

रोहित शर्मा हा जबाबदारी ओळखणारा खेळाडू आहे. आपण लयीत नाही हे लक्षात घेऊन कर्णधार असतानाही तो स्वतःहून संघाबाहेर झाला. या मालिकेत आमच्याकडून काही चुका झाल्या हे मी स्वीकारतो. मात्र, आमच्यासाठी बऱ्याच सकारात्मक गोष्टी घडल्या याकडेही दुर्लक्ष होता कामा नये. प्रथमच ऑस्ट्रेलियात खेळलेल्या यशस्वी जैस्वाल, नितीश रेड्डी आणि आकाश दीप यांसारख्या खेळाडूंची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. – गौतम गंभीर, भारतीय संघाचा प्रशिक्षक.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coach gautam gambhir appeals to show commitment to playing tests to team sports news amy