भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत हे जेतेपद पटकावलं. भारतीय महिला संघाने आयसीसीचा पहिलाच विश्वचषक पटकावला आहे. या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा सत्कार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, ज्यामध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी भारतीय महिला संघाच्या कामगिरीचं कौतुक केलं आणि संघाचं अभिनंदन करणारा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. तसंच, संघातील महाराष्ट्रातील तीन महिला खेळाडूंना राज्य सरकारतर्फे रोख पारितोषिक देण्याचंही ठरवलं असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून (CMO) देण्यात आली.

भारतीय महिला क्रिकेट संघामध्ये महाराष्ट्राच्या तीन खेळाडू आहेत. यात महाराष्ट्रातील सांगलीची कन्या भारताची उपकर्णधार स्मृती मानधना आहे. तिच्याशिवाय भारताच्या सेमीफायनल विजयाची शिल्पकार जेमिमा रॉड्रीग्ज व फिरकीपटू राधा यादव आहेत. या तिन्ही खेळाडूंचा राज्य सरकारकडून सत्कार करण्यात येणार रोख रक्कम पारितोषिक देण्यात येईल. याशिवाय संपूर्ण भारतीय संघाचा सत्कार करण्यात येणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

महिला विश्वचषकात स्मृती मानधना ही सर्वाधिक धावा करणारी दुसरी खेळाडू होती. तर भारताकडून तिने स्पर्धेत ५४.२५च्या सरासरीने सर्वाधिक ४३४ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एक शतक व दोन अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय स्मृती मानधना भारताच्या वर्ल्डकप विजेत्या संघाची उपकर्णधार आहे.

जेमिमा रॉड्रीग्ज ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताच्या सेमीफायनल विजयाची हिरो ठरली. जेमिमाने या सामन्यात शतकी खेळी करत भारताला महिला वनडे इतिहासातील विश्वविक्रमी विजय मिळवून दिला. जेमिमाने या सामन्यात १२७ धावांची नाबाद खेळी केली होती. याशिवाय मैदानावर ती उत्कृष्ट फिल्डिंग करते.

राधा यादव ही भारताची फिरकीपटू आहे. राधाला स्पर्धेत फक्त तीन सामने खेळण्याची संधी मिळाली. राधाने बांगलादेश, ऑस्ट्रेलियाविरूद्ध सेमीफायनल तर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध अंतिम सामना खेळली. राधाने या तिन्ही सामन्यांमध्ये महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या.